संस्थाचालकांनी मतांची ठेकेदारी केली

0

चाळीसगाव । चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांनी मतांची ठेकेदारी केली असून जवळचे व कर्मचारी यांना सभासद केले असल्याचा आरोप यात निवडणुकीत अपक्ष म्हणून उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ज्या शिक्षण संस्थेची शतकोत्तर वाटचाल सुरू आहे. त्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीची एकेकाळची प्रतिमा व प्रतिष्ठा काय होती व आज काय आहे. सत्ताकाळात संस्थेचा मानसन्मान, प्रतिष्ठा वाढेल असे कोणतेही काम झाले नाही. 2009 मध्ये एकमेकांविरोधात लढवून आरोप प्रत्यारोप आज एकत्र निवडणूक लढवित आहेत. नोकरभरतीत भ्रष्टाचार केला, कोर्टकचेरीच्या कामात कसे कमीशन खाल्ले, याबाबत सर्व माहिती जगजाहीर झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील मतदारांकडे मते मागतात मग आजपर्यंत ग्रामीण भागातील मतदारांना अथवा त्यांच्या मुलांना संस्थेत किती नोकर्‍या दिल्या असे सांगून राजकारणी लोक या संस्थेत घेण्याचे कारण काय? असा सवालही त्यांनी सभासदांसमोर उपस्थित केला.

जाहिरातबाजीसाठी पैसा आला कोठून
शाळा व महाविद्यालयाचा विस्तार तालुक्याबाहेर नाही, मात्र सभासद विदेशासह सगळीकडे आहेत. सध्याची निवडणूकही एज्युकेशन सोसायटीची आहे मात्र मोठाले बॅनर लावून जाहिरातबाजी केली जात आहे. यासाठी यांच्याकडे पैसा कुठून आला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवून त्यांनी नाव कमावले असून परिवर्तन पॅनलचे प्रमुख सांगत आहेत ते चुकीचे असून त्या विद्यार्थ्यांनी येथून शाळा सोडल्यानंतर बाहेर चांगल्या ठिकाणी प्रवेश घेवून मेहनतीने यश मिळवून नाव कमावले. त्याचे श्रेय घेण्याचा कुणाला अधिकार नाही, असे सांगितले.

सत्ताधार्‍यांचा बेकायदेशीर कारभार
इतर शाळांच्या तुलनेत या कार्यकाळात नॅकने महाविद्यालयाला 74 टक्के गुण देवून बी ग्रेड दर्जा दिला आहे. स्वतःच्या शिक्षण संस्था असतांना या संस्थेत येण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित करण्यात आला व जे लोक आपले ऐकतील अशाच लोकांना उमेदवारी दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी या निवडणुकीत आल्यावर संस्थेत मनमानी कारभार चालू देणार नाही असे सांगून मतदारांना फक्त निवडणुकीपुरते वापरले जाते. 2010 पासून आजपर्यंत बेकायदेशीर भरती प्रक्रिया राबवली, सभासदांची दिशाभूल करून त्यांना फसवले जाते, तसेच शिक्षण, व्यापार, वैद्यकीय क्षेत्रात ज्यांचे योगदान आहे त्यांना घेतले असते तर समजले असते मात्र स्वार्थासाठी राजकारणी लोक घेतले व एकाच घरातील 2 दोन लोक पॅनलमध्ये घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच निवडून आल्यावर संस्थेच्या हिताचे कामे करणार असल्याचे किसनराव जोर्वेकर यांनी यावेळी सांगितले.