कर्तव्य फाऊंडेशनतर्फे झाले पुरस्कार वितरण
पिंपरीः कर्तव्य फाऊंडेशनतर्फे गोर-गरीब, अनाथांसाठी सामाजिक बांधिलकी जोपासून काम सुरू आहे. त्यांच्यासाठी आपले ‘कर्तव्य’ बजावत आहेत. फाऊंडेशनचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे मत बेंटलर प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापक मेजर विरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले.
कर्तव्य फाऊंडेशनच्या दुसर्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी देहूगाव येथील सरस्वती लॉन्स येथे उल्लेखनीय कार्य करणार्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच 27 मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. याप्रसंगी मिरचंदानी ट्रस्टचे मार्गदर्शक विनोद वनवारी, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, तंटामुक्तीचे अध्यक्ष अतूल काळोखे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी पंडीत, पर्यवेक्षक आनंद तांबे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी विटकर, सत्यवान लोखंडे, माजी सरपंच नितीन गाडे, बिडवे कंपनीचे वैश्य सर आदी उपस्थित होते.
उल्लेखनीय कार्याबद्दल दिले पुरस्कार
कर्तव्य फाऊंडेशनच्यावतीने 20 शालेय मुलींना बुट, मोजे तर 5 मुलींना दप्तर, वह्या, पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तर, काही मुलांना प्रवेश शुल्क भरण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली. तसेच मिरचंदानी ट्रस्टच्यावतीने दोन मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनच्या सुदुंबरे शाखेची स्थापना करण्यात आली. पानी फाऊंडेशन अंतर्गत जलसंधारणाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उस्मानाबाद जिल्ह्यातील पाथरूड येथील पानी फाऊंडेशन टीम, शैक्षणिक क्षेत्रात खेडमधील सतारकावस्ती येथील जि. प. शाळा शिक्षक व ग्रामस्थांचा, वैद्यकीयमध्ये श्री गजानन फाऊंडेशनचे डॉ. श्रीनिवास राव, दुर्ग संवर्धनाबद्दल सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे, छायाचित्रकार सचिन फुलसुंदर यांचा सन्मान करण्यात आला. कर्तव्य फाऊंडेशनतर्फे प्रत्येक महिन्यात चार सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गेल्या वर्षभरात गोर-गरीबांना 4 लाखांपेक्षा अधिक रकमेची विविध स्वरूपात मदत करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनच्या सदस्यांनी दिली.