वाडा| येथील शिक्षक संचालित शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या माध्यमिक शाळेत गेली सात वर्षे वर्ष विनावेतन सेवा करणार्या शिक्षिकेला संस्थाचालकांनी तडकाफडकी कामावरून काढल्याने याविरोधात या शिक्षिका येत्या 2 ऑक्टोबर रोजी शाळेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या माध्यमिक शाळेत बीएससी बीएड या जागेवर नूतन सीताराम बोरसे या शिक्षिका म्हणून सात वर्षांपूर्वी रुजू झाल्या. दरम्यान, 1 नोव्हेंबर 2013च्या शिक्षणाधिकार्याच्या आदेशान्वये त्यांना शिक्षणसेवक म्हणून मान्यता दिली.
शिक्षणसेवक म्हणून त्यांनी आपला तीन वर्षांचा सेवाकाळ पार पाडला. शिक्षणसेवक पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संस्थेने त्यांचा मान्यतेसाठी प्रस्तावदेखील शिक्षणाधिकार्याकडे पाठवला. तो प्रस्ताव मान्यतेच्या प्रक्रियेत असताना संस्थेचे सरचिटणीस भ. भा. जानेफळकर यांनी शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या 16 जानेवारी 2017 च्या परिपत्रकाचा आधार घेत पटपडताळणीमुळे 2 मे 2012 पासून अतिरिक्त ठरलेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन झालेले नसल्यामुळे संस्थेने नियुक्ती दिलेल्या शिक्षकांचे नियुक्ती आदेश रद्द केल्याचे म्हणत या शिक्षिकेला 7 मे 2017 रोजी तडकाफडकी कामावरून कमी केल्याचे पत्र दिले.
आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव
बोरसे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने संस्थेची बदनामी होत असल्याचे म्हणत संस्थेने शिक्षिकेला वकिलामार्फत नोटीस पाठवून त्यांच्यावर आंदोलन मागे घ्यावे म्हणून दबाव आणण्याचा प्रकार सुरु केल्याचा आरोप बोरसे यांनी केला. पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्याशी संपर्क केला असता हे प्रकरण संस्थेशी संबंधित आहे. नियुक्ती देणारी संस्था आहे. त्यामुळे संस्थेने याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. आमच्याकडे आलेल्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार आहेत. सध्या मान्यता देण्यावर बंदी असल्याचे त्यांनी सांगितले.