संस्थेसह तिघा शिक्षकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे

0

आयोजकांच्या निष्काळजीमुळेच गेले तीन विद्यार्थ्यांचे बळी

मुळशी : कातरखडक येथे चेन्नईहून उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी हे शिबिर आयोजित करणार्‍या जॅकलिन स्कूल ऑफ थॉट या संस्थेसह चौघांवर पौड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाने दोघांचे मृतदेह खोल पाण्यातून शोधून काढले. याप्रकरणी जॅकलिन स्कूल ऑफ थॉट या संस्थेचे संचालक, शिक्षक, स्थानिक शिबिर आयोजक आणि मुलांना मार्गदर्शन करणारे स्थानिक शिक्षक अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, कातरखडक गावच्या पोलिसपाटलांनी फिर्याद दिली आहे. दानिश राजा (वय 14), संतोष गणेश (वय 14), सर्वांण्णा कुमार (वय 14, तिघे रा. चेन्नई, तामिळनाडू) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. दानिश याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी ग्रामस्थांनी पाण्यातून बाहेर काढला होता.

उन्हाळी शिबिरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
बुधवारी कातरखडक गावात चेन्नई येथील ई. सी. आय. मॅट्रिक्युलेशन स्कूलचे 20 विद्यार्थी आणि दोन शिक्षक उन्हाळी शिबिरासाठी आले होते. जे शिबिर जॅकलिन स्कूल ऑफ थॉट या संस्थेने आयोजित केले होते. सायंकाळी पाच वाजता ही मुले पाण्यात खेळत असताना दानिश, संतोष आणि सर्वांण्णा हे तिघे पाण्यात बुडाले. ग्रामस्थांनी सायंकाळी दानिशचा मृतदेह बाहेर काढला. उर्वरित दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. शिबिर आयोजित केलेली जॅकलिन स्कूल ऑफ थॉट ही संस्था नोंदणीकृत नाही, त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. या 20 विद्यार्थ्यांच्या निवास आणि भोजनाची सोय गावातील एका घरामध्ये केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये प्रचंड निष्काळजीपणा झाल्याने ही दुर्घटना घडली. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे पालक गुरुवारी दुपारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर वातावरण अधिकच गंभीर झाले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली. उन्हाळ्यामध्ये अशाप्रकारे अनेक संस्था कोणतीही खबरदारी न घेता मुलांच्या जिवाशी खेळत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर म्हणाले, तिन्हीही विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आले. इतर सर्व विद्यार्थीही गुरुवारी चैन्नईला परत गेले आहेत.