सकल समष्टीचे प्रेरणादाते!

0

बाबासाहेबांविषयी लिहायचं, बोलायचं झालं की नेमक्या कोणत्या पैलूवर लिहावं, बोलावं असा प्रश्न पडतो. त्यांचं व्यक्तिमत्वच तसं. अष्टपैलू म्हणावं तर ‘अष्ट’ हा शब्दही तोकडा वाटू लागतो. पुन्हा त्यात उद्धारकवगैरे उपाध्याही मला त्यांना एका मर्यादेत कोंडणाऱ्याच वाटतात. उगाचच सुर्याला सकाळी झोपेतून उठवणारा असं म्हटल्यासारखंच.

सूर्य ऊर्जादाता. अवघ्या चराचराला गतिमान ठेवणारा. ऊर्जेनं साऱ्यांनाच भारून चैतन्यांना अवघ्यांना सळसळवणारा. निरंतर मिळणाऱ्या त्याच्या ऊर्जेमुळे अवघी सृष्टी चालते. त्याच्या प्रभावाखाली घडत नाही असं सृष्टीत काही नसावं. पर्वतशिखरांना गवसणी घालणाऱ्या वाऱ्यापासून समुद्रात उसळणाऱ्या लाटांपर्यंत सारं काही सुर्याच्या प्रभावाखालीलच. रात्री जरी तो नसला तरी चंद्राकडून येणारी शितल किरणही मुळात सुर्याच्याच प्रभावाचीच.

मग अशा सुर्याला कसं पाहायचं? दिवस ज्याच्यामुळे उगवतो आणि आम्हाला झोपेतून उठावे लागतं तो सूर्य असं त्याला छोटं करुन पाहाणं योग्य ठरेल? बाबासाहेबांचंही तसंच. त्यांनी उद्धार केलाच. समाजाला जागवलंच. गुलामगिरीतच खितपत पडून त्यालाच आपलं जीवन मानणाऱ्यांना ते चुकीचं असल्याची जाणीव तर करुन दिलीच पण त्या अवस्थेतून बाहेरही काढलं. मुळात हे करणं, ते ही त्याकाळी ज्यावेळी सकल समाज खूपच वेगळ्या मानसिकतेत होता, मुळीच सोपं नव्हतं. पण बाबासाहेबांनी ते करुन दाखवलं.

पण केवळ ते तेवढ्यावरच कुठे थांबले? जागवलं आणि सोडून दिलं. आता आपलं आपण पाहून त्यांचं ते पाहतील, असंही नाही त्यांनी केलं. एका समाजघटकावरील शतकानुशतकांचा अन्याय दूर केलाच. मात्र नंतर ते तेथच थांबले. त्यातच समाधान मानून पुढे काहीच केले नाही, असंही नाही. जागवल्यानंतर माणूस म्हणून आत्मभान दिल्यानंतर माणूस म्हणून उभे करण्यासाठी शिक्षणाचा जीवनमंत्रही दिला. मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी बाबासाहेबांनी उभारलेल्या शिक्षणसंस्था या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केलेल्यांना माणूस म्हणून उभे करणाऱ्या प्रयोगशाळा होत्या. स्वत:चं महत्व वाढवणारी शिक्षणसाम्राज्य नव्हती. पुन्हा ती विशिष्ट वर्गांसाठीच मर्यादित असं करण्याचा विचारही या अमर्याद प्रतिभेच्या धन्याच्या मनात आला नसावा.

त्यातूनच त्यांचं सर्वव्यापी कर्तृत्व दिसतं. ज्यांचा उद्धार केला, त्यांच्यापलिकडे पाहिलेच नाही असेही नाही. उलट ज्यांच्या शोषण व्यवस्थेतून त्यांनी एका समाजघटकाला सोडवलं त्या शोषक समाजघटकांसाठीही त्यांनी खूप काही केलं. स्वातंत्र्यानंतरच्या नवभारताची जी व्यवस्था उभी राहिली ती जगातील सर्वोत्कृष्ठ घटनेच्या पायावर. सुर्य जसा ऊर्जा देताना त्याच्यासमोर येणाऱ्यांमध्ये भेदाभेद करत नसतो तशीच आपली घटना. भेदाभेद न करणारी. तसेच बाबासाहेब. सकल समाजाचा…सकल समष्टीचा विचार करुन त्यासाठीच जीवनभर प्रयत्न केले.

हिंदू कोड बिल. हा तर वेगळाच विषय. बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर केलेले मोठे उपकारच. मात्र का कोणास ठाऊक त्यावेळी पंडित नेहरु या उदारमतवादी महान नेत्याने ‘मोरली करेक्ट’ वागण्यापेक्षा ‘पॉलिटिकली करेक्ट’ वागणं पसंत केलं. काही कलम वगळता बिल अडवलंच गेलं. बाबासाहेबांनी समस्त हिंदू समाजाला लिंगभेद न करता दिलेले समानतेचे हक्क टाळले गेले. बाबासाहेब स्वाभिमान दाखवत मंत्रिमंडळातून बाहेर आले. पुढे काही वर्षांनी पंडित नेहरुंनी श्रेय घेत वेगळ्या कायद्यांच्या स्वरुपात त्यातील काही तरतुदी मंजूर केल्या. आणि मालमत्तेतही समान हक्क देण्याच्या सुधारणा तर आता काही वर्षांपूर्वी कऱण्यात आल्या. पण त्यात 60 वर्षे गेली. काळाचा पुढचा विचार करणाऱ्या बाबासाहेबांचे ऐकले असते तर माणूस म्हणून उभे राहणे अधिक सोपे झाले असते. बाबासाहेबांचा मंत्र हा सकलांचा सक्षमीकरणाचा होता. त्याचा फायदा सर्वांनाच झाला. अधिक झाला असता.

सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न चर्चेत आहे. अनेकांचे उल्लेख होतात. अनेक मिरवतात. मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात व्हॉइसरॉय कॉन्सिलमध्ये असताना बाबासाहेबांनी बंगाल राज्यात जलसंधारणाच्या योजना राबवल्या त्यांचा स्थानिक शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. तसंच त्यांच्या नियेजन कौशल्यामुळेच अनेक मोठ्या धरणांचे नियोजन योग्य प्रकारे झाले. त्यातही सर्वात मोठे धरण असणाऱ्या भाक्रा-नांगल प्रकल्पातील त्यांचे योगदान तर तेच जनक म्हणून उल्लेख करावा असेच मानले जाते.

नोटाबंदीनंतर आर्थिक विषयांवरील बाबासाहेबांच्या अभ्यासाची खूप चर्चा झाली. प्रॉब्लम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहून देशाला आर्थिक मार्गदर्शनही केल्याचे नव्याने लक्षात आले. पण इंग्रजी राजवटीत रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीपासून रुपयाच्या अवमुल्यनाबद्दलही तत्कालिन सत्ताधाऱ्यांना रोखठोक सल्ला देणारे अर्थतज्ज्ञ बाबासाहेब तसे कमीच ज्ञात आहेत.

बाबासाहेब हे बाबासाहेब होते. त्यांना उगाचच कोणत्याही एका विशिष्ट प्रतिमेत, मर्यादेत कोंडणे म्हणजे सूर्याला जाड काळ्या काचेतून पाहून तो किती छोटा दिसतो त्याचा भ्रामक आनंद मिळवण्यासारखंच मूर्खपणाचे आहे. ते उद्धारक होतेच…पण अखंड मानवजातीचे. कारण त्यांनी दिलेल्या घटनेने भारतीयांना जसं समानपातळीवर आणलं तसंच विसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात स्वातंत्र्य झालेल्या आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांनी आपल्याच घटनेच्या प्रकाशात मार्गाक्रमण केले.

कोणीही असो. क्षेत्र कोणतेही असो. अवस्था कितीही बिकट असो. बाबासाहेबांचे त्याक्षेत्रातील योगदान आठवायचे, विचार आठवायचे आणि प्रेरणा घेऊन आपलं कर्तृत्व उभारायचं. त्यामुळेच बाबासाहेब आहेत आणि असणारच ते म्हणजे एक मोठे प्रेरणादाते. ज्यांना-ज्यांना माणूस म्हणून जगायचं आहे, त्या सकलांसाठी.
तुळशीदास भोईटे