पिंपरी चिंचवड : विकास हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला पाहिजे. अन्यथा महासत्ता बनण्याचे स्वप्न हे दिवा स्वप्नच ठरेल. सकल समाज सुखी करणे ही महासत्ता बनण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे प्रथम भारत हे आनंदी राष्ट्र झाले पाहिजे, असे मत ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी व्यक्त केले. किवळे येथील विकासनगर व्याख्यानमाला समितीची तीन दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन राजेंद्र घावटे यांच्या हस्ते झाले. प्रथम पुष्प घावटे यांनी भारत एक महासत्ता स्वप्न आणि वास्तव या विषयाने गुंफले. माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, उद्योजक राजेश मांढरे, ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, इलियास खान, सुरेखा वाघ आदी उपस्थित होते.
सरकार कुणाचेही असो कार्य उत्तम असावे…
हे देखील वाचा
राजेंद्र घावटे म्हणाले की, देश महासत्ता होण्याचे स्वप्न जरूर पाहिले पाहिजे. परंतु, महासत्ता असणार्या देशात सर्व आलबेल आहे अशी परिस्थिती आहे का ? महासत्ता होण्यासाठी आज अनेक अंतर्गत आणि बाह्य प्रश्न आहेत. सरकार कुणाचेही असो, त्यांना उत्तम कार्य करण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे. महासत्तेचे स्वप्न पाहताना भारत हे आनंदी राष्ट्र झाले पाहिजे. भारताच्या वैभवशाली परंपरांचा, वैशिष्ट्यांचा गौरव करत असतानाच येणार्या आव्हानांना मुकाबला करण्याची तयारी जनतेने मनापासून केली पाहिजे.
समस्यांनी प्रगती खुंटते…
देशात असणार्या समस्यांनी देशाची प्रगती खुंटते. आतंकवाद, भ्रष्टाचार, सार्वजनिक नैतिकता, स्वैराचार, पर्यावरण र्हास, नद्यांची गटारगंगा, परीक्षार्थी व पोटार्थी शिक्षण व्यवस्था, टोकाची धर्मांधता, जातीपातीचे गलिच्छ राजकारण, भडक प्रसार माध्यमे, अंधश्रद्धा, दुरावलेला देशाभिमान, सार्वजनिक आचारसंहितेचा अभाव, यावर जनतेने मात केल्यास भारत सुजलाम सुफलाम होण्यास निश्चितच वाव असल्याचे त्यांनी सांगितले. संत साहित्य, सुधारक, समाजसेवक यांचे अनेक दाखले देत, कुसुमाग्रज, केशवसुत, रवींद्रनाथ टागोर, बाबा आमटे आणि संतांच्या काव्यपंक्तीची आपल्या मनोगतात पेरणी करत घावटे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष अविनाश गाडे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र कदम यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता पांडे, माणिकराव ऐकाड, मारुती बराटे आदींनी संयोजन केले.