सकारात्मक जगण्यातून मिळवा तणावापासून मुक्ती

0

आरती चौधरी ; अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे ‘एक दिवस माझ्यासाठी’ उपक्रम

भुसावळ- सकारात्मक जीवन जगल्यास सर्व तणावातून मुक्ती मिळते त्यामुळे आनंदी, प्रसन्न राहून प्रत्येक काम करा, असा सल्ला आरती चौधरी यांनी येथे देत प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर बनावे,असा सल्ला त्यांनी दिला. शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे अंगणवाडी सेविका व मदतनिसांसाठी ‘एक दिवस माझ्यासाठी’ उपक्रमाचे माळी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले. याप्रसंगी चौधरी बोलत होत्या.

आपणही घ्यावी आरोग्याची काळजी -डॉ.नेहेते
बालरोग तज्ज्ञ डॉ. निलीमा नेहेते म्हणाल्या की, दुसर्‍यांना काळजी घेण्याचा सल्ला देताना आपणही आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. गरोदरपणात योग्य काळजी घेतल्यास जन्मणारे प्रत्येक मुल हे सुदृढ जन्माला येते. यासाठी प्रत्येक महिलेने योग्य आहार व व्यायाम तसेच तणावमुक्त जीवन जगावे, असे त्या म्हणाल्या.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.नीलिमा नेहते होत्या. व्यासपीठावर इनरव्हील अध्यक्षा नूतन फालक, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळच्या अध्यक्षा सुनीता पाचपांडे, सुनीता देविदास पवार, पंचायत समिती उपसभापती वंदना उन्हाळे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, सचिव लता सोनवणे, गायकवाड आदींची उपस्थिती होती.

आरोग्याकडेही द्या लक्ष -रजनी सावकारे
रजनी सावकारे प्रास्ताविकात म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांना शासनाने लहान मुलांसह गरोदर व स्तनदा मातांच्या नोंदी घेणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे यासंदर्भात मोठ्या जबाबदार्‍या सोपवल्या आहेत. त्यातच कौटुंबिक जबाबदारी पार पडताना आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक महिलेने कौटुंबिक तसेच नोकरीवरील जबाबदारी पार पाडताना आरोग्याचीही काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

महिलांसाठी विविध स्पर्धा
प्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ विषयावर ‘स्लोगन व पोस्टर’ स्पर्धा तसेच एकांकिका स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुनसगावच्या ग्रुपने एकांकिकामध्ये प्रथम बक्षीस पटकावले. किन्ही व निंभोरा बुद्रुक येथील महिलांनी गीत सादर केले तर दर्यापूरच्या महिलांनी नृत्य तसेच भुसावळच्या ग्रुपने भारुड सादर केले. स्लोगन व पोस्टर स्पर्धेत अलका बडगुजर यांनी प्रथम, प्रीती वायकोळे यांनी द्वितीय बक्षीस पटकविले. संगीत खुर्ची तसेच एक मिनिट आदी स्पर्धा घेण्यात आल्या. उपस्थित महिलांना सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी म्हणून पेन व संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून भगवतगीता व हळदी कुंकवाचे वाण देण्यात आले. सूत्रसंचालन मोनिका अग्रवाल यांनी केले.

यांनी घेतले परीश्रम
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण पर्यवेक्षिका जोशी, गायकवाड, कुलकर्णी, शहरी पर्यवेक्षिका सावदेकर, तडवी व मंडळाच्या सचिव लता सोनवणे, सदस्य अनिता आंबेकर, सारीका यादव, मनीषा काकडे, सरला सावकारे, श्रद्धा चौधरी, योगीता खडसे, अर्चना सोनवणे, माधुरी पाटील, अलका भटकर, सुनंदा भारुळे यांनी परीश्रम घेतले.