‘सकारात्मक विचारांमुळे घडतात चांगले विद्यार्थी ’

0

पुणे । विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवायचे असेल, तर आपल्याला आनंदी अध्ययनाची कला अवगत केली पाहिजे. सामान्य विद्यार्थ्याला असामान्य व्यक्ती घडविण्याचे दायित्व शिक्षकावर असते. त्यामुळे शिक्षकाने स्वतः आनंदी, सकारात्मक विचारांतून मित्रत्वाच्या नात्याने मार्गदर्शन करायला हवे. त्यातून विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होतो, असे मत प्रसिद्ध वक्ते आणि इकोल सॉलिटेयर इंडियाचे संस्थापक संचालक मिनोचर पटेल यांनी व्यक्त केले.

घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजतर्फे आयोजित ‘आनंदी अध्ययनाची शक्ती : सामान्यातून अतिसामान्य’ या विषयावरील कार्यशाळेत मिनोचर पटेल बोलत होते. प्रसंगी डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. आशुतोष मिसाळ, डॉ. जे. जे. पाटील, समन्वयक प्रा. शिवाजी माने यांच्यासह पुण्यातील विविध शाळा-महाविद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. डॉ. जे. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शिवाजी माने यांनी आभार मानले.

इंटरनेट विद्यार्थ्यांचा गुरु
पटेल म्हणाले, वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे कर्तव्य आपण शिक्षक म्हणून बजावले पाहिजे. प्रत्येक दिवस नवीन आणि एक नवी सुरुवात असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या चेहर्‍यावर सकारात्मकत वृत्ती जोपासावी. त्यातूनच विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण होत असतो. आपल्याकडे असलेल्या उपलब्धीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भूतकाळावर रडण्यापेक्षा आणि भविष्यकाळाच्या आशेवर जगण्यापेक्षा वर्तमान आनंदात घालवला पाहिजे. तंत्रयुगात इंटरनेट विद्यार्थ्यांचा गुरु बनला आहे. त्यामुळे शिक्षकांपेक्षा मुलांना अधिक गोष्टी माहित असू शकतात. मात्र, त्याला संस्कारी आणि अधिकृत शिक्षण देणे शिक्षकांशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही.