पुणे । माणसाला जीवन एकदाच मिळते. हे जीवन जगण्याच्या प्रवासात अनेक चढउतार येतात. स्वप्नपूर्तीच्या वाटेत समस्याही उद्भवतात. परंतु, अशा संकटकाळातही सकारात्मक विचार करणे हाच तणावमुक्त जीवनाचा मार्ग आहे. निश्चित ध्येय, जिद्द आणि योग्य नियोजन असेल, तर सुखी जीवन जगता येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते आणि लक्ष्य गुरुकुलचे संचालक प्रा. बालाजी जाधव यांनी केले. असोसिएशन फॉर सिव्हिल इंजिनिअर्स डेव्हलपमेंटतर्फे (एसीईडी) ‘ताणतणाव व्यवस्थापन’ या विषयावरील आयोजित सेमीनारमध्ये प्रा. जाधव बोलत होते. याप्रसंगी अनिल कुलकर्णी, साई ईश्वरन, प्रकाश भट, निखिल शहा, मदन खांडेकर, अशोक रेतावडे, विलास भोसले, प्रविण मुंढे, सतीश यंबल, गोविंद देशपांडे उपस्थित होते.
सकारात्मकता ठरते उपयुक्त
साईटवरची कामे वेळेत करणे, गुणवत्तेत तडजोड होणार नाही याची काळजी घेणे, सामाजिक, कौटुंबिक जबाबदार्या पार पाडणे अशा विविध गोष्टींचा ताण आपल्यावर असतो. त्यातून शारीरिक, मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. अशावेळी योग्य नियोजन, आरोग्याची काळजी आणि स्वतःला जपत सकारात्मक गोष्टींवर भर देणे गरजेचे असते. आनंदी जीवन जगण्यासाठी सकारात्मकता अतिशय उपयुक्त ठरते, असे प्रा. बालाजी जाधव यांनी सांगितले.
अतिरिक्त ताणामुळे येते आजारपण
तणावमुक्त जीवन जगण्याचे मार्ग आपण शोधत राहिले पाहिजे, असे अनिल कुलकर्णी यांनी सांगितले. अभियंत्यांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, सुरक्षिततेबाबत जागृत करणे, या क्षेत्रातील नोकर्या, संधी योग्यरित्या पोहोचवणे आदी गोष्टींवर काम करणार आहे. 800 अभियंते या असोसिएशनचे सभासद असल्याची माहिती प्रकाश भट यांनी दिली. सतीश यंबल यांनी सूत्रसंचालन, प्रविण मुंढे यांनी प्रास्ताविक, विलास भोसले यांनी आभार मानले.