सकारात्मक समूहातून आंतरीक ऊर्जेची निर्मिती

0

मुख्याधिकारी किशोर चव्हाण : ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे ज्ञानरत्न पुरस्कारांचे वितरण

भुसावळ – व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी समूहाची भूमिका महत्त्वाची असते. समूहात राहून एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान होते. समूह जर सकारात्मक व कौशल्यपूर्ण असेल तर त्या समूहात राहणार्‍या प्रत्येकामध्ये आंतरीक ऊर्जेची निर्मिती होत असते. याच ऊर्जेमुळे समूहातील प्रत्येक व्यक्ती समाजाच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत राहतो. अशाच प्रकारचे कार्य ज्ञानासह मनोरंजन ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने होत असून समाजासाठी विविधांगी उपक्रम राबविणारी ही एक सामाजिक व शैक्षणिक चळवळ असल्याचे प्रतिपादन फैजपूर येथील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी येथे केले.

भुसावळात ज्ञानरत्न पुरस्काराचे वितरण
भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाच्या वाचन कक्षात ज्ञानासह मनोरंजन गृपच्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त आयोजित ज्ञानरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नंदूरबार डीआयईसीपीडीचे अधिव्याख्याता प्रा.अनिल झोपे तर प्रमुख पाहुणे म्हणून वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, रावेरचे कृषीतज्ज्ञ दिलीप वैद्य व जळगावच्या बालविश्व विद्यामंदिराच्या संचालिका भारती चौधरी उपस्थित होत्या. प्रास्ताविकात ग्रुप प्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी गृपच्या माध्यमातून आतापर्यंत राबविलेल्या विविध 18 उपक्रमांची माहिती व्हिडिओद्वारे दिली. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शिक्षकी पेशाबरोबरच राजकारण व समाजकारणात केलेले कार्य आणि आलेला अनुभव कथन करून शिक्षकांनी आपल्यावर झालेला अन्याय सहन न करता त्या अन्यायाविरुद्ध प्रखरतेने दाद मागावी, असे आवाहन केले. मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सक्षमता व समर्थता आणि संयमी व शांत प्रवृत्ती जोपासावी, असे सांगितले. कृषीतज्ञ दिलीप वैद्य यांनी ईस्राईल दौर्‍यात अनुभवलेल्या तंत्रज्ञानयुक्त शेतीबाबत माहिती देऊन संशोधनात्मक शेती केल्यास उत्पादनात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्रा. अनिल झोपे यांनी सर्वांनी एकत्र आल्यास चांगल्या विचारांचा एकच सुंदर समूह तयार होतो, असे सांगून एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणार्‍या ज्ञानासह मनोरंजन गृपचे कौतुक केले. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 10 व्यक्तींना ज्ञानरत्न पुरस्कार 2018 स्मृतिचिन्ह, मोत्यांची माळ, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बालभारतीत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल गृप प्रमुख डॉ. जगदीश पाटील यांचा सेवानिवृत्त प्राचार्य बी. आर. पाटील यांनी सत्कार केला. पुरस्कारार्थी मनोगत मनीषा ताडेकर व हेमांगिनी चौधरी यांनी व्यक्त केले. आषाढीच्या पार्श्वभूमीवर विजय चौधरी यांनी ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या अभंगाचे गायन केले. सूत्रसंचालन संजीव बोठे यांनी तर आभार दंगल पाटील यांनी मानले.

दहा व्यक्तींना ज्ञानरत्न पुरस्कार प्रदान
जीवन पांडुरंग महाजन (सेंट अलॉयसीस मराठी प्राथमिक शाळा, भुसावळ), संजय तुकाराम ताडेकर (सानेगुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल), प्रा.चंद्रकांत मुरलीधर बोरोले (द.न.वांद्रेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाल, ता.रावेर), अमितकुमार जानकीराम पाटील (जिल्हा परीषद प्राथमिक शाळा वाघळूद, ता.यावल), श्रीमती ज्योती नंदलाल बेलसरे (जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, टहाकळी, ता. भुसावळ), प्रा.उमाकांत रूपचंद पाटील (शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय फैजपूर, ता.यावल), डॉ. हेमंत सत्यनारायण अग्रवाल (ओम हॉस्पिटल, टिंबर मार्केट भुसावळ), हेमांगिनी पुष्कर चौधरी (स्वा.सै.कृ.पा.पाटील प्राथमिक विद्या मंदीर, भुसावळ), डॉ.मुकेश निंबा कुळकर्णी (आर्यन इको रेसॉर्ट, जळगाव), अमोल वसंतराव दांदळे (सेंट अलॉयसीस हायस्कूल, भुसावळ) अशा दहा व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मोत्यांची माळ, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, डॉ.दिलीप ललवाणी, दंगल पाटील, श्रीकांत जोशी, सुनील वानखेडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यादी वाचन डॉ. दिलीप ललवाणी यांनी केले.