सकाळच्या सुरत पॅसेंजरच्या वेळेत बदल ; चाकरमान्यांना मोठा दिलासा

0

खासदार रक्षा खडसे यांची रेल्वे प्रशासनाने केली मागणी मान्य ; डाऊन इटारसीसह वर्धा पॅसेंजरची कनेटीव्हीटी आता भुसावळ-सुरत पॅसेंजरशी ; दोन दिवसानंतर होणार वेळेत बदल

भुसावळ- ईटारसीसह वर्ध्याकडून येणार्‍या पॅसेंजरची सकाळच्या सुरत पॅसेंजरशी कनेक्टीव्हीटी असलीतरी अनेकदा या गाड्या उशिराने धावत असल्याने सुरज पॅसेंजन निघून गेल्यानंतर बोदवड, मलकापूरसह वरणगाव भागातून नोकरीसह काम-धंद्यानिमित्त जळगावात जाणार्‍या नोकरदारांना मोठा मनस्ताप सोसावा लागत होता शिवाय या वेळेत अन्य दुसरी गाडीदेखील नसल्याने त्यांना जादा भाडे खर्च करून जळगाव गाठावे लागत होते. ही समस्या सोडवण्यासाठी नोकरदारांनी खासदार रक्षा खडसे यांना साकडे घातल्यानंतर त्यांनी गुरूवारी सकाळी भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांची बैठक घेवून या विषयावर तोडगा काढण्यासाठी आग्रह धरला. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर डाऊन ईटारसी व वर्धा पॅसेंजर सकाळी 8.30 वाजेपर्यंत भुसावळात आणण्याचे व या गाड्यावर वेळेवर धावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन डीआरएम यांनी देत सकाळी 8.40 वाजता सुटणारी भुसावळ-सुरत पॅसेंजर दहा मिनिट विलंबाने सोडून 8.50 वाजता सोडण्याचा निर्णय मान्य केला. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नोकरदारांनी घातले खासदारांना साकडे
रावेर, बोदवड भागातून शिक्षण, नोकरी तसेच व्यवसाय व रोजगारानिमित्त दररोज जळगाव जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर लोक सकाळच्या वर्धा-भुसावळ पॅसेजरने भुसावळात येतात व नंतर सुरत पॅसेंजरने पुढील जळगावचा प्रवास करतात मात्र अनेकदा वर्धा तसेच ईटारसी पॅसेंजर विलंबाने धावत असल्याने सुरत पॅसेंजर निघून जात असल्याने या प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत होता शिवाय भुसावळ-सुरत पॅसेजर सुटल्यानंतर काशी एक्स्प्रेसशिवाय अन्य दुसरी गाडी नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता शिवाय बसने जावयाचे म्हटल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंडही सोसावा लागत होता. याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रवाशांनी खासदार रक्षा खडसे यांना साकडे घातले होते.

डीआरएम यांच्यासोबत केली चर्चा
गुरूवारी सकाळी 10 वाजता खासदार रक्षा खडसे यांनी डीआरएम आर.के.यादव यांच्याशी चर्चा केली. प्रसंगी रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, भाजप शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे तसेच वरीष्ठ वाणिज्य मंडळ प्रबंधक सुनील मिश्रा, सहायक परिचालन प्रबंधक (कोचिंग) जे.एम. रामेकर तसेच रावेर आणि बोदवड परिसरातील तक्रारदार नागरीक बैठकीला उपस्थित होते. डीआरएम यांच्या चेबरमध्ये झालेल्या बैठकीत खासदार खडसे यांनी रावेर रेल्वे स्थानकांवर काही गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली.