सक्षम अधिकार्‍याअभावी कुर्‍हा विज वितरण कार्यालय वार्‍यावर

0

मुक्ताईनगर। तालुक्यातील कुर्‍हा येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय सक्षम अधिकारी नसल्यामुळे ग्राहकांच्या समस्या सोडविण्यास असमर्थ ठरत आहे. याठिकाणी ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुणीही नसल्यामुळे कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहे. कर्मचार्‍यांच्या या कारभाराबाबत वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करुन देखील कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वारंवार खंडीत होणार्‍या विजपुरवठ्यामुळे संताप
ग्रामीण भागातील नागरिकांच्या विज पुरवठ्यासंबंधी अडचणी सोडविण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत लागलीच दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कुर्‍हा येथे कार्यालय आहे. मात्र येथे समस्या घेऊन येणार्‍या ग्राहकांच्या समस्याच सुटत नसल्यामुळे हे कार्यालय ग्राहकांसाठी मनस्ताप देणारे ठरत आहे. कुर्‍हा परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. वायरमन शोधून सापडत नाही. साधा फ्यूज गेला तरी तासन्तास कुणीही कर्मचारी फ्यूज टाकण्यासाठी येत नाही. रात्रीच्या वेळी तर विजेअभावी संपूर्ण रात्रच नागरिकांना अंधारात काढावी लागते.

कर्मचारी करतात मलकापूरहून ये-जा
सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे ग्रामीण भागात साप, विंचू यांसारखे सरपटणारे विषारी प्राणी घरात तसेच परिसरात फिरत असतात. रात्रीच्या वेळेस विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अंधारात अशा विषारी जनावरे दृष्टीस पडत नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात सापडू शकतो. याबाबत कार्यालयात ग्राहकांनी दुरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो उचलला जात नाही. विजवाहक तार तुटला अथवा काही अनुचित घटना घडली असता कार्यालयाच्या लॅडलाईनवर संपर्क केला तर येथील कर्मचारी फोनच उचलत नसल्याची तक्रार केली जात आहे. येथील कर्मचार्‍यांवर अधिकार्‍यांचा काही वचक नाही. येथील कर्मचारी मलकापुरहून ये-जा करतात. त्यामुळे ऐनवेळी काही अडचण उद्भवल्यास कर्मचारी हजर राहत नसल्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.