सख्खा भाऊच झाला वैरी ; जळगावात मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

0

दारु पिण्यावरुन वादाचे ठरले निमित्त ; खूनानंतर आत्महत्या केल्याचा बनाव

जळगाव :- दारुच्या नशेत भावंडामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचा मनात राग ठेवून सर्व कुटुंबिय झोपल्यावर जय प्रल्हाद मरसाळे याने लहान भाऊ दिपक प्रल्हाद मरसाळे वय 25 पिंप्राळा हुडको याचा डोक्यात लाकडी दांडका मारुन खून केल्याची घटना शनिवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास समोर आली. या घटनेने सख्या भाऊच झाला वैरी या म्हणीचा प्रत्यय आला आहे. विशेष म्हणजे खून करुन भावाने आत्महत्या केल्याचा बनाव करणार्‍या संशयित मोठा भाऊ जय मरसाळे याला रामानंद पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात वडीलांच्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित जय मरसाळे याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रल्हाद तानकू मरसाळे (रा. पिंप्रळा, हुडको) यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा विजय प्रल्हाद मरसाळे हा जैनाबाद परिसरात पत्नी मुलाबाळांसह वास्तव्यास आहे. तर जय प्रल्हाद मरसाळे (वय- 35) आणि दीपक प्रल्हाद मरसाळे ( वय-25) असे दोन्ही भाऊ आई-वडीलांसह पिंप्राळा हुडकोत मातंग वाड्यात एकत्र कुटूंबात राहतात. घर छोटे पडते म्हणून प्रल्हाद मरसाळे यांनी शेजारचे घर भाड्याने घेतले असून पती-पत्नी तेथे राहतात. वडील आणि मुलं मोल मजुरीची कामे करतात.

दारु पिण्याचा वाद ठरला खूनाचे निमित्त
शुक्रवारी संध्याकाळी मोठा भाऊ जय आणि दिपक यांच्यात नेहमी प्रमाणे पैसे आणि दारु पिण्यावरुन वादाला सुरवात झाली. नेहमीचा वाद म्हणून कुटूंबीयांनी दुर्लक्ष केले, रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जेवणानंतर पुन्हा दोघांमध्ये हाणामारी झाल्याने वडील प्रल्हाद आणि जयची पत्नी रेखा अशांनी दोघांचे भांडण सोडवल्यावर दोघेही झोपून गेले. पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास जयने आरडा ओरड करीत लहान भाऊ दिपकने गळफास घेतल्याचे आई-वडीलांना सांगीतले. शेजारीच राहत असल्याने प्रल्हाद व त्यांची पत्नी मिराबाई मरसाळे यांनी धाव घेतली. मुलगा दिपक मयत अवस्थेत पडलेला होता. घटनेची माहिती पोलिसांना कळताच सकाळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला.

गळफास घेवून आत्महत्या केल्याचा बनाव
दिपकचा निपचीत पडलेला मृतदेह…आणि घरात रक्त सांडलेले होते. निरखुन बघीतल्यावर जमीनीवर पुसलेले रक्त दिसून आले. वडील प्रल्हाद यांना संशय आल्याने त्यांनी जयला विचारपुस केली. त्याने झोपलेला असतांनाच दिपक पंख्याला लटवकून घेतले, सकाळी पाहिल्यावर त्याला खाली उतरवतांना तो, खाली पडल्याने डोक्यावर जखम झाली व त्यातून रक्त वाहिल्याचे जय सांगत होता. घडला प्रकार संशयास्पद असल्याने वडील प्रल्हाद व जय यांच्यात हमरीतुमरी होऊन..माझं म्हणण ऐकत नाही म्हणून..जयने वडीलांनाही मारहाण केली.

पोलीस उपअधीक्षकांसह फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळावर
घटनेची माहिती कळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, गुन्हेशाखेचे निरीक्षक, फॉरेन्सीक पथक घटनास्थळावर दाखल झाले. मृतदेहाचा जागीच पंचनामा करण्यात येवुन घटनास्थळावर सांडलेल्या रक्ताचे नमुने संकलीत करुन पोलिसांनी बिछान्यावरील गोधडी, लाकडी दांडका ताब्यात घेत, संशयीताला अटक केली. अटकेनंतर संशीताची प्राथमीक चौकशी केल्यावर त्याने पोलिसांनाही उडवा उडवीची उत्तरे दिली. मी खून केला नसून भावाने आत्महत्या केल्याचेच तो पोलिसांना सांगत काही महिन्यापुर्वी त्याला मनोविकृती मुळे पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. परिणामी रितसर अटक करुन त्याला पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले.