जळगाव : तालुक्यातील म्हसावद तेथे घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाचा डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. जितेंद्र प्रकाश इंगळे वय ३० असे मयत मोठ्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
म्हसावद येथील खडसे नगर भागात जितेंद्र हा त्याचा भाऊ आईसह राहात होता. गुरुवारी सायंकाळी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जितेंद्र याचे भाऊ संदीपसोबत भांडण झाले. या भांडणातून संदीप याने जितेंद्र यांच्यावर लाकडी दांडक्याने वार केले. घरामागील दशरथ धरमसिंग वाघेले यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता संदीप याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने दशरथ यांनाही मारहाण केली. यात दशरथ यांना हाताला दुखापत झाली. यानंतर गावातील समीर पठाण व सद्दाम मनियार यांनी दोघांचे भांडण सोडवले. जखमी अवस्थेत जितेंद्र रस्त्यावरच पडला होता. गावातील त्याचे मामा दशरथ गंगाराम कोळी यांनी जखमी जितेंद्रला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी दशरथ धर्मसिंग वाघेले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये संदीप इंगळे वय २५ विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचीही माहिती मिळाली आहे.