सगळीकडे भाजप, तरीही प्रश्‍न तिथेच!

0

पिंपरी : केंद्रात यांचे सरकार, राज्यात यांचे सरकार, महापालिकेत यांचे सरकार मग प्रश्‍न का सुटत नाहीत? मेट्रो अर्धवटच आणली, शास्तीकराचा प्रश्‍न अर्धवटच सोडवला, अनधिकृत बांधकामांचा, रेड झोनचा, रिंग रोडचा सारे प्रश्‍न जैसे थे आहेत मग गेल्या तीन- साडेतीन वर्षात या भाजपने केले काय? असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ शहरात राष्ट्रवादीकडून रविवारी (दि. 26) ’हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी विविध मागण्यांचे निवेदन अप्पर तहसिलदार संजय भोसले यांना दिले.

आमच्या कामांचे फोटो दाखवतात
पवार म्हणाले, कामे होतात त्याला इच्छा शक्ती व उत्तम नेतृत्व हवे. यांचे सगळे फुसके बार आहेत. सत्तेत येण्यापासून ते आत्ता पर्यंत केवळ फेका-फेकी यांनी केली. शहराच्या बाबतीतही तेच केले. सरकार बजबाबदारपणे वागत असल्यामुळे मला रस्त्यावर उतरावे लागत आहे. ज्या शहराला आम्ही सत्तेत असताना स्वच्छतेचा मान मिळवून दिला, त्या शहरात आज मला कचर्‍याचे ढीग ठिकठिकाणी दिसत आहेत. मेट्रो येईल; पण रस्त्यांची दुरवस्था केली. आम्ही जी भूमीपुजने केली त्याच कामांचे हे फोटो दाखवतात. त्यामुळे आज शहराची ही दुरावस्था झाली आहे. एवढेच काय तर यांचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात रस्त्यावर खड्डे पडले म्हणून काय आभाळ फाटलं का? वाहरे पठ्ठे… आधी रस्त्यावरचे खड्डे बुजव मग बोल?

बुलेट ट्रेन मग परदेशात जाईल
सरकारचे धोरण किती ढिसाळ आहे किंवा सरकारचे काम किती भोंगळ आहे याचे उदाहऱण नुकतेच घडले. परवा शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीला गेले होते. मात्र वापस येत असताना ट्रॅक चुकल्याने त्यांची ट्रेन 180 किमी मागे गेली व थेट मध्यप्रदेशात पोहचली. हा अंतर जवळ-जवळ मुंबई पुणे एवढा आहे. म्हणजे यांची साधी ट्रेन एवढी चुकु शकते तर उद्या बुलेट ट्रेन आली तर ती चुकली तर दुस-याच देशात जाईल ना आणि यांना ते कधी कळणार असा टोला लगावत पवारांना उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

डिसेंबरपासून राज्यभर आंदोलन
सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे अशी हल्लाबोल आंदोलने राज्यात सर्वत्र होणार आहेत. 29 नोव्हेंबरला पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन तर 1 ते 12 डिसेंबर मध्ये यवतमाळ ते नागपूर असे आंदोलन करण्यात येणार आहे. याच बरोबर राज्यातील प्रत्येक जिल्हायात असे आंदोलन करुन विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधीकारी व तहसीलदारांना दिले जाणार आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.