मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ऐरणीवर आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांच्या प्रचंड गोंधळानंतर विधानसभाअध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. या मागणीसाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेचे आमदार देखील आक्रमक झाल्याने सरकार चांगलेच कोंडीत सापडले आहे. तिसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी विधानभवनासमोर जोरदार निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील सर्व आमदार उपस्थित होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतमालाला हमी भाव द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. सभागृहात देखील याच मागणीसाठी विरोधी पक्षाने रान उठवले. सध्या राज्यात सर्वात महत्वाचा प्रश्न हा शेतकरी आत्महत्या असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी यासाठी सभागृहात विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 12 वाजेपर्यंत दोन वेळा स्थगित केले. यानंतरही कर्जमाफीसाठी गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
योग्य वेळ शेतकरी संपल्यावर येणार का? :- अजित पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्री योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत. रोज शेतकरी मरत आहे. सगळे शेतकरी मेल्यावर योग्य वेळ येणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी करत सरकारवर तोफ डागली. पवार पुढे म्हणाले की, 2 वर्षात 8 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एवढं होऊनही आपल्याला लाज वाटत नाही. उद्योगपतींना कोट्यवधींची कर्जमाफी दिली जाते मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचे पवार यांनी सांगितले. कर्जमाफी करावी अशी 150 पेक्षा जास्त आमदारांची मागणी असून देखील निर्णय का घेतला जात नाही हा गंभीर प्रश्न असल्याचे पवार म्हणाले.
कर्जमाफी होईस्तोवर कामकाज होऊ देणार नाही :- राधाकृष्ण विखे पाटील
आधी नापिकीमुळे शेतकरी मरत होते, आता शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. यामुळे तातडीने कर्जमाफी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कर्जमाफी होईस्तोवर कामकाज होऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले. हमी भावापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांची लूट केली आहे. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा राज्यात कुठलाही प्रश्न महत्वाचा नसल्याचे सांगत केवळ याच मुद्दयावर चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. हे बळीराजाचे नाव नव्हे तर शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्याचे राज्य आहे असा आरोप विखेपाटील यांनी लावला. जवानांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत पारिचारक यांना निलंबित करण्याची देखील मागणी विखेपाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
कर्जमाफीसाठी शिवसेना आमदारही विरोधकांसोबत
कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेनेचे अनेक आमदार देखील सभागृहात विरोधकांसोबत सरकारवर हल्लाबोल करत होते. सभागृहाबाहेर मात्र सेनेच्या आमदारांनी वेगळा रस्ता धरला. सभागृहात सुरुवातीला विरोधक आक्रमक होते. यानंतर हळूहळू सेनेचे आमदार देखील विरोधकांसोबत कर्जमाफीच्या मागणीसाठी सहभागी झाले व घोषणाबाजी देखील केली. सुरुवातीला विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सुरुवातीला ‘सामना’तील शेतकाऱ्यांसाठी सरकारविरोधी भूमिका वाचून दाखवली होती. अजित पवार यांनी देखील 150 च्या वर आमदार कर्जमाफीची मागणी करत असल्याचे सांगितले. कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपाची साथ सोडली तर दुसरीकडे पारीचारक यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी देखील शिवसेना सरकारच्या विरोधात असल्याचे पवार यांनी सांगितले.
विधानभवनासमोर निदर्शने
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील व राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार? असा खडा सवाल उपस्थित करत विधानभवनासमोर जोरदार निदर्शने केली. सगळे शेतकरी मेल्यावर मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ येणार आहे का? असे म्हणत अजित पवार यांनी मागणीला जोर दिला. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, सरंजामी सरकार धिक्कार असो, मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, भाजप सरकार हाय- हाय यांसारख्या घोषणांनी परिसर निनादुन गेला.
चंद्रकांत दादा आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू!
सभागृहात कर्जमाफीची मागणी करताना अजित पवार यांनी चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून पवार यांनी, ‘ दादा तुम्ही नंबर 2 चे मंत्री आहात. काहीतरी खमक्या निर्णय घ्या. तुम्ही निर्णय घेतलात तर आम्ही सगळे मिळून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू’ असे म्हटले. यावर ना. पाटील यांनी हसून दाद दिली. तसेच ना. जानकर यांना उद्देशून, ‘लाल दिवा मिळाला की आंदोलन संपलं की काय तुमचं?’ असा टोला लगावला. यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आम्ही कधीच कर्जमाफीला विरोध केला नसून, योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू असे सांगितले.