रावेर- डाऊन नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसला रावेर रेल्वे स्टेशनवर प्रायोगिकरीत्या थांबा मिळाल्यानंतर मंंगळवारी सायंकाळी रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर लोको पायलट अनिल चव्हाण यांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत केले. मंगळवारी एक्स्प्रेस उशीराने धावत असल्याने ती रात्री नऊ वाजता आल्यानंतर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शहराध्यक्ष मनोज श्रावगे, प्रल्हाद पाटील (मोरगावकर), संदीप सावळे, भास्कर महाजन, अमजद खान, दिलीप पाटील, शहर युवाध्यक्ष लखन महाजन, पप्पू गिनोत्रा, योगेश प्रजापती, रवींद्र पाटील, उमेश महाजन भूषण पाटील, दीपक नगरे आदी भाजपाच्या जल्लोष केला. प्रसंगी स्टेशन मास्तरांचाही सत्कार करण्यात आला.
27 जुलैपर्यंत केवळ थांबा
रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्याने मंगळवार, 19 जूनपासून रावेर रेल्वे स्थानकावर डाऊन 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे मात्र हा थांबा केवळ कामायनी एक्स्प्रेस सुरू होईपर्यंत म्हणजे केवळ 27 जुलैपर्यंत आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरून कायमस्वरुपी अप-डाऊन सचखंडला येथे थांबा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रावेर शहर व परीसरातील रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.