मुंबई । मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’चा सन्मान मिळाला, तो आचरेकर सरांमुळे. त्यामुळे रमाकांत आचरेकर यांनाही भारतरत्न मिळाला पाहिजे, असे मत माजी क्रिकेटपटू, सचिनचा मित्र आणि आचरेकरांचा शिष्य विनोद कांबळी यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतील भेंडीबाजारात माझा जन्म झाला. गल्ली क्रिकेट खेळायचो. ज्यावेळी बाऊंड्री मारायचो, त्यावेळी बॉल अर्धा कापून यायचा. कुणाच्या कालवणात गेला, कुणाच्या बिर्याणीमध्ये गेला. मात्र आचरेकर सरांनी आम्हाला क्रिकेट खेळताना पाहिले आणि त्यांनी आम्हाला घडवले, अशा शब्दात विनोद कांबळींनी आपल्या गुरुंचे ऋण व्यक्त केले.
मी ग्रामीण भाग निवडालाय
सचिनला ‘भारतरत्न’ हा सगळ्यात मोठा मान मिळाला, तो आचरेकर सरांमुळेच. आचरेकर सरांना द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला, मात्र मला वाटतं त्यांना ‘भारतरत्न’ दिला पाहिजे अशा भावना विनोद कांबळी यांनी व्यक्त केल्या. ज्यांनी भारतीय संघाला आठ ते नऊ खेळाडू दिले, त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे होता. संपूर्ण जीवन आचरेकर सरांनी क्रिकेटसाठी दिले. जे आचरेकर सरांनी आम्हाला दिले, त्याची परतफेड करण्यासाठी मी सिंधुदुर्गमधील ग्रामीण भागात खेळाडू घडवण्यासाठी प्रशिक्षण देईन.