सचिन अंदुरेकडील पिस्तुलानेच गौरी लंकेश यांची हत्या

0

पुणे-अनिसचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या चौकशीतून आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ‘सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातून ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली’, असा खळबळजनक दावा सीबीआयने केला आहे. सचिन अंदुरेला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सीबीआयने हा दावा करत सचिन अंदुरेच्या कोठडीची मागणी केली. त्यानुसार सचिनला ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंदुरेच्या मेहुण्याकडून काळ्या रंगाचे देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असे तपासात पुढे आले आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरेने हत्येचा कट रचला होता, असा दावा सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात केला.

शरद कळसकर याची पोलीस कोठडी लवकरच संपत आहे. सीबीआयला त्याला तपासासाठी ताब्यात घ्यायचे आहे. दोघांची एकत्रित चौकशी करायची असल्याने यावेळी सचिन अंदुरेची उपस्थिती आवश्यक आहे. त्यासाठी सचिन अंदुरेची सीबीआय कोठडी आवश्यक आहे असे सरकारी वकिलांनी यावेळी सांगितले.

सीबीआय कोठडी दरम्यान दाभोळकर हत्येप्रकरणी काहीच तपास झालेला नाही. तपास झाला असेल तर त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट सीबीआयने सादर करावा. त्यामुळे सीबीआय कोठडी न देता न्यायालयीन कोठडीत देण्यात यावी असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे. सीबीआयने अकोलकर आणि पवार मारेकरी नसल्याचे मान्य करावे किंवा ते चार्जशीट चुकीचे होते हे मान्य करावे असेही ते म्हणाले.