मुंबई । मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुंबई क्रिकेट संघटनेच्या टी 20 मुंबई लीगच्या ब्रँड अॅम्बेसेडेरपदी निवड करण्यात आली आहे. अनेक वेळा घोषणा आणि तारखा जाहीर करुनही एमसीएला या स्पर्धेसाठी मुहूर्त सापडला नव्हता. आता ही स्पर्धा 11 28 मार्च दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या नव्या निवडीबद्दल सचिन तेंडुलकरने आनंद व्यक्त केला. सचिन म्हणाला की, मुंबई क्रिकेट संघटनेशी जोडले जाणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
या लीगमुळे केवळ मुंबईकरांचे केवळ मनोरंजन होणार नसुन, त्यामुळे मुंबईतील युवा आणि होतकरु क्रिकेटपटूंना चांगले व्यासपिठ मिळणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अधिपत्याखाली आणि प्रोबॅबलिटी स्पोर्ट्समार्फत खेळवण्यात येणार्या या स्पर्धेत सहा संघांमध्ये विजेतेपदासाठी झुंजी रंगतील. त्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण असे संघ असतील. या सहा संघांसाठी आता नव्याने नविदा मागवण्यात आल्या आहेत. सचिन तेंडुलकरसारखा दिग्गज खेळाडु या लीगशी जोडला गेल्यामुळे त्याच्या वलयाचा आणि द्यानाचा फायदा खेळाडुंना मिळेल असे प्रोबॅबलिटी स्पोर्ट्सचे मुख्याधिकारी कादर मकानी यांनी सांगितले.