सचिन तेंडुलकर पुणे गणेशोत्सवाचा ब्रॅण्ड अम्बेसिडर!

0

पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ब्रॅण्ड अम्बेसिडर असेल, यावर सोमवारी महापालिकेत झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव चांगलाच दिमाखात पार पडणार आहे.

भिमाले यांची संकल्पना
सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना जगाला देणार्‍या पुण्यनगरीतील उत्सवाला यंदा 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात पक्षनेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, काँग्रेसचे अविनाश बागवे आदी उपस्थित होते. या उत्सवासाठी तेंडुलकरला ब्रॅण्ड अम्बेसिडर नेमण्याविषयी चर्चा करण्यात आली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी ही कल्पना मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.

25 जुलैपासूनच कार्यक्रमांची रेलचेल
यानंतर महापौर टिळक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत 25 ऑगस्टरोजी सुरु होणार्‍या गणेशोत्सवासाठी महिनाभर आधी कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती दिली. 25 जुलैपासून शहरातील गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने महापालिका हे कार्यक्रम राबवणार असल्याचेही त्या म्हणाल्या. हे कार्यक्रम येत्या 11 जुलैला घेण्यात येणार्‍या पुढील बैठकीत निश्चित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तोपर्यंत गणेशोत्सवाविषयी नागरिक त्यांना सुचणार्‍या कल्पना महापौर कार्यालयापर्यंत पोहोचवून त्यात सहभागी होऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या. गणेशोत्सवासाठी विशेष बोधचिन्ह तयार करणार असल्याची कल्पनाही समोर असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी महापालिका 2 कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे यावेळी करण्यात येणार्‍या उपक्रमांसाठी गटनेत्यांच्या सूचना मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे बागवे यांनी महापालिकेने यंदा 125 वर्षांची आठवण पुस्तिका प्रकाशित करावी, अशी सूचना केली. तसेच या प्रसंगाची आठवण म्हणून प्रत्येक मंडळाला एक स्मृतीचिन्ह भेट देण्यात यावे असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तुपे यांनी प्रशासनाने विसर्जनासाठी हौदांची संख्या वाढवावी, अशी सूचना केली. आठव्या दिवसानंतर खुले होणारे हे हौद पहिल्या दिवसापासून खुले व्हावेत, असेही त्यांनी सूचविले.

मंडळांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी महापौरांची मध्यस्थी
यंदा जवळपास 35 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ते गुन्हे मागे घेतले नाहीत तर उत्सवावर बहिष्कार टाकू, अशी भाषा काही मंडळांनी केली आहे. त्यावर महापौर टिळक यांनी हे गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्र्यांकडे मध्यस्थी करणार का यावर सकारात्मक उत्तर दिले आहे. मंडळे ही शहराचीच आहेत आणि मीदेखील गणेशमंडळाची कार्यकर्ती आहे. त्यामुळे महापौर म्हणून मध्यस्थी करेन, असे त्या म्हणाल्या.