नवी दिल्ली: राजस्थानमधील कॉंग्रेसचे दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेल्याने अशोक गेहलोत यांचे सरकार अडचणीत आले होते. कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडील उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले. मात्र अजूनही त्यांनी कॉंग्रेस सोडलेले नाही. त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर त्यांनी अद्याप पायलट यांनी जाहीर प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. त्यांनी अद्याप मौन बाळगले आहे. मात्र ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतण्याचे चिन्हे आहेत. कारण त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटीसाठी वेळ मागितला असून ते राहुल गांधींची भेट घेणार आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संबंध ताणले गेल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. २०-२५ समर्थक आमदारांसोबत त्यांनी बंड केला. त्यानंतर कॉंग्रेसने त्यांना परत येण्याची वेळ दिली, मात्र ते आले नाहीत. त्यानंतर अखेर कॉंग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली. मात्र त्यांनी कॉंग्रेस सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने ते अद्यापही कॉंग्रेसमध्येच आहेत. पुन्हा ते कॉंग्रेसमध्ये सक्रीय होऊ शकतात असे बोलले जात आहे.