जयपूर: कॉंग्रेस नेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. त्यामुळे कॉंग्रेसच्या चिंतेत वाढ झाली होती. कॉंग्रेसने सचिन पायलट आणि समर्थक आमदारांना परत येण्याबाबत विनंती केली होती. मात्र सचिन पायलट समर्थकांसह परतले नाही, शेवटी कॉंग्रेसने सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्याकडील उपमुख्यमंत्री पद आणि प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे. कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांनी याची घोषणा केली आहे.
पर्यटन मंत्री विश्वेंद्रसिंह, मंत्री रमेश मीना यांच्याकडीलही मंत्रीपद काढण्यात आले आहे. पक्षाची बदनामी होईल अशी कामगिरी केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सचिन पायलट आणि त्यांच्या सोबतच्या काही आमदारांनी ८ कोटी जनतेने निवडून दिलेल्या सरकारला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हे कृत्य खपवून घेण्यासारखे नाही असे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
सचिन पायलट यांच्यानंतर शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांची कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.