पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यपदाचा शिवसेनेचे नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच, स्मार्ट सिटीच्या संचालक पदावरून शिवसेनेने न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जून महिन्यात निवडी
महापालिकेच्या जून महिन्यातील सर्वसाधारण सभेत वृक्ष प्राधिकरण समितीवर आणि स्मार्ट सिटीच्या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेईकल) या कंपनीवर सदस्य निवडण्यात आले होते. शिवसेनेचे प्रमोद कुटे यांची स्मार्ट सिटीवर संचालक म्हणून तर सचिन भोसले यांची वृक्ष प्राधिकरण समितीवर भाजपने निवड केली. त्याला शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला होता. शिवसेनेच्या नगरसेवकांची निवड भाजपने कोणाला विचारून केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
भाजपच्या प्रवृत्तीला विरोध
राहुल कलाटे यांनी प्रमोद कुटे आणि सचिन भोसले यांना सदस्यपद स्वीकारू नये, असे पत्र दिले होते. त्यानंतर भोसले यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक पदाबाबत आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असेही कलाटे यांनी सांगितले. तर, प्रमोद कुटे यांच्या निवडीला आपला कसलाच विरोध नाही. परंतु, भाजपने परस्पर नावे का जाहीर केली? भाजपच्या प्रवृत्तीला आपला विरोध आहे, असेही ते म्हणाले.