मुंबई । इंग्लंडमध्ये विश्वातील महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या जीवनपट उलगडविणारा ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ आज, शुक्रवार रोजी सगळीकडे प्रदर्शित होत आहे. सचिनच्या स्वप्नांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटातून सचिनच्या आतापर्यंत गूढ राहिलेल्या काही गोष्टी त्याच्या चाहत्यांना समजतील, अशी चर्चा आहे. क्रिकेट चाहत्यांना सचिनच्या चित्रपटाची उत्सुकता दिसून येत असताना अशीच उत्सुकता भारतीय क्रिकेट खेळाडूंमध्येही पाहायला मिळाली. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या प्रिमियर शोला भारतीय संघातील खेळाडूंनी हजेरी लावली होती. ’आयुष्यातील महत्त्वाच्या चढउतारांप्रसंगी माझ्या मनात काय चालले होते, हे ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या जीवनपटातून सर्वाना कळेल. त्यामुळे क्रिकेटपटू म्हणून मी सर्वानाच ज्ञात असलो, तरी व्यक्ती म्हणून मी यात उलगडलो आहे,” असे सचिन तेंडुलकरने स्पष्ट केले आहे.
खेळाडूंनी व्यक्त केल्या भावना
प्रीमियर शो पाहिल्यानंतर अनेक खेळाडूंनी चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजिंक्य रहाणेने चित्रपटानंतर ट्विटरवरुन सचिनचे आभार मानले. अजिंक्यने, प्रत्येक भारतीयाला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद!, असे लिहिले आहे. तर के.एल. राहुलने ट्विटरवर लिहिले आहे की, चित्रपट खूपच चांगला आहे. तुम्ही माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहात. तुमचा हा चित्रपट बिलियन लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. चित्रपटामुळे सचिन सरांच्या गूढ गोष्टी जाणून घेता आल्या. हा चित्रपट म्हणजे ग्रेट व्यक्तिची ग्रेट स्टोरी असल्याचे भुवनेश्वर कुमारने म्हटले आहे. शिखर धवननेही ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. चित्रपट फारच आवडल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच सचिनची प्रत्येक भेट ही खूपच प्रेमळ असते, असे त्याने लिहिले आहे. एक व्यक्ती म्हणून सचिन कसा आहे ते ‘सचिन :अ बिलियन ड्रिम्स’ या त्याच्या जीवनपटातून उलगडण्यात आले आहे. सचिनवरील आत्मचरित्र 2014 मध्ये प्रकाशित झाले होते. जेम्स एर्स्किन यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि रवी भागचंदका यांची निर्मिती असलेला ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’चा खास प्रिमियर मुंबईत पार पडला. प्रिमियरला सचिनची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन हेदेखील उपस्थित होते. चाहत्यांनी पाहिलेल्या सचिनपेक्षा बरेच काही चित्रपटात पाहायला मिळेल, अशी सचिनला खात्री आहे.
’हा सिनेमा खूप प्रेरणादायी, खूप सुंदर आहे. सचिनच्या पदार्पणापासून रिटायर्टमेंटपर्यंत, भारतात आणि खेळात कसा फरक पडत गेला, हे तुम्हाला लक्षात येईल. हा सिनेमा सचिनची मेहनत दाखवतो, सचिन दाखवतो. यंगस्टर्सना प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे. कठोर मेहनतीने शून्यातून विश्व निर्माण होऊ शकते हे सचिनच्या आयुष्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. केवळ टॅलेंट असून उपयोग नाही, तर त्याला मेहनतीची जोड हवी, तेच या सिनेमातून दिसते.’
– महेंद्रसिंग धोनी
हा सिनेमा खूप खास आहे. बालपणीच्या आठवणी परत जाग्या झाल्या. मला क्रिकेटर बनण्याची प्रेरणा ज्यामुळे मिळाली, ते क्षण आठवले. सचिन कसा होता, त्याची मेहनत कशी होती, हे नव्याने पाहायला मिळाले. हा केवळ सिनेमा नसून प्रेरणेचे एक अनोखे स्त्रोत आहे. प्रत्येक खेळाडूंना प्रेरणा मिळावे असे व्यक्तिमत्व अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडले गेले आहे. या सिनेमाला मोठे यश मिळेल.
– विराट कोहली