तीस चाळीस वर्षांपूर्वी संघ भाजपच्या काही मोजक्या नेत्यांबरोबर चिंतामण वनगा यांनी छातीचा कोट केला. हल्ले परतवून लावण्यात किंवा हल्ले झेलण्यासाठी आदिवासी समाजातील हा लढवय्या नेता कधी डगमगला नाही. संघ निष्ठा हेच आपले जीवन समजून ते आयुष्यभर सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना काय मिळाले, तर अवहेलना आणि पश्चात्ताप.
चिंतामन वनगा हे भाजपच्या महाराष्ट्रातील इतिहासातले महत्त्वाचे नाव. भारतीय जनता पक्ष जेव्हा देशभरात धक्के खात होता तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पालघरसारख्या आदिवासी पट्ट्यात दोन आदिवासी मोहरे तयार केले. त्यात एक चिंतामन वनगा आणि दुसरे म्हणजे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा. त्यात वनगा हे व्यक्तिमत्त्व एकदम साधे, सोज्वळ. प्रामाणिकपणे पक्षाचे काम करायचे, हेच त्यांना माहीत. त्यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या जागेवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. वनगा कुटुंबाला तिकीट नाकारून भाजपने दुसरा पर्याय शोधल्यामुळे वनगा यांच्या कुटुंबीयांनी थेट मातोश्री बंगला गाठला आणि दुखावलेले वनगा कुटुंब शिवबंधनात अडकण्यास तयार झाले. हा असंतोष भाजपला परवडणारा नक्कीच नाही. भाजपच्या धूर्त राजकारण्यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच भविष्यासाठी घातक ठरणारा आहे. आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचा विचार केल्यास भाजप हा हजारो नव्हे, तर कोट्यवधी कार्यकर्त्यांचे जाळे असलेला पक्ष. याबाबत दुमत असण्याचे कारणही नाही. एक कार्यकर्ता किंवा नेता घडवण्यासाठी काही वर्षे खर्ची करावी लागतात. हे भाजपच्या मंडळींना सांगण्याची गरजही नाही. तळागाळातून विशेषत: आदिवासी समाजातून पुढे आलेल्या चिंतामण वनगा सारख्या एका ज्येष्ठ आणि दिवंगत खासदाराच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांकडे भाजपने दुर्लक्ष करावे. वार्यावर सोडावे. त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करावा ही घटना भाजपच्या अनेक निष्ठावंताना विचार करायला लावणारी ठरणार आहे. आजचा जो पालघर जिल्हा आहे तो पूर्वी ठाणे जिल्ह्यात होता. पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात कम्युनिस्टांची फार मोठी ताकद होती. विशेषत: डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड आदी तालुक्यांत लालबावट्याचा दरारा होता. त्यामुळे आदिवासी पट्ट्यात दुसर्या एखाद्या पक्षाचे रोपटे उगवताच खुडून काढले जायचे. कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि संघाची शाखा किंवा वनवासी कल्याण केंद्र चालवणे ही फार अवघड बाब. थेट तीर कमठ्यांचा हल्ला पाड्यांवर व्हायचा. मात्र, त्या काळात म्हणजेच तीस चाळीस वर्षांपूर्वी संघ भाजपच्या काही मोजक्या नेत्यांबरोबर चिंतामण वनगा यांनी छातीचा कोट केला आज त्यांच्या कुटुंबाला भाजप जे फळ देऊ इच्छित आहे ते नक्कीच कृतघ्नपणाचे लक्षण आहे. वनगा डाव्यांशी झुंजत राहिले. लढत राहिले. लाठ्याकाठ्या खात राहिले.
डाव्यांच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या वनगांना पालघरचे आदिवासी कसे विसरतील. तलासरीच्या वनवासी कल्याण केंद्रावर झालेला हल्ला आठवला तर वनगांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसतो. हल्ले परतवून लावण्यात किंवा हल्ले झेलण्यासाठी आदिवासी समाजातील हा लढवय्या नेता कधी डगमगला नाही. संघ निष्ठा हेच आपले जीवन समजून ते आयुष्यभर सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना काय मिळाले, तर अवहेलना आणि पश्चात्ताप. वनगांना भाजपनेही भरपूर दिले, असे आता भाजपचे पोपट बोलू लागले आहेत. त्यांनी संघ आणि पक्ष सांगेल ती जबाबदारी आयुष्यभर खांद्यावर घेतली. भाजपला तिथे उमेदवारही मिळत नव्हता तेव्हा वनगा लढले. कधी कुरबुर केली नाही की कधी कोणाविषयी तक्रार केली नाही. आपले काम भले की आपण. कोणत्याही कामाचे श्रेय लाटणे यांना कधी जमले नाही. राजकारणात असूनही प्रसिद्धीच्या झगमगाटात त्यांचे कधी मन रमले नाही. न केलेल्या कामाचे श्रेय त्यांनी कधीही घेतले नाही. इतका प्रामाणिकपणा राजकारणात चालत नसतो हे त्यांना कोणी सांगितले तर ते फक्त स्मित करीत.त्यांच्या संघ आणि पक्षनिष्ठेविषयी कधीच शंका घेता येणार नाही. संघ हाच त्यांचा श्वास होता. वनगांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. तसे झाले असते तर न्याय झाला असे म्हणता आले असते. कदाचित वनगांच्या कुटुंबातील सदस्याला तिकीट द्यायचे नसेलही पण, पक्ष नेतृत्वाने त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. राजकारणात अनेकदा संघर्ष करावा लागूनही वनगा यांनीही कधी संघ आणि भाजप सोडून विचार केला नाही. ते जर आज असते आणि पक्षाने त्यांना आगामी निवडणुकीत तिकीट दिले नसते तरी ते वनवासी कल्याण केंद्रात खुर्ची टाकून बसले असते. पण, भाजप सोडला नसता. राज्यात अशा घटनांमुळे आजपर्यंत ज्या पोटनिवडणुका झाल्या आणि होत आहेत त्याकडे पाहिले तर असे लक्षात येते की दिवंगत आमदार, खासदारांच्या कुटुंबातच उमेदवारी देण्यात आली आहे. हा सर्व पक्षांचा एक अलिखित नियम बनला आहे. चिंतामण वनगा अतिशय साधे होते. त्यांच्यावर प्रेम करणारे भलेभले राजकारणी राज्यात आणि देशात होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, माजी आमदार वसंतराव पटवर्धन, आनंद दिघे यांच्यासह इतर पक्षातील नेतेही वनगांकडे एक अजातशत्रू नेता म्हणून पाहत होते. वनगांच्या निधनानंतर पालघरमध्ये भाजपच्या वरिष्ठ मंडळींनी लक्ष घालायला हवे होते. मुळात पालघर जिल्हा हा काही भाजपचा बालेकिल्ला नाही. या जिल्ह्यात हितेंद्र ठाकुरांची बहुजन विकास आघाडी, शिवसेना, काँग्रेसचीही ताकद आहे. पालघरच्या पोटनिवडणुकीत नेमके काय होते. कोण बाजी मारते हा नंतरचा भाग आहे. पण, वनगांच्या कुटुंबाने शिवसेनेची वाट का धरली हा मूळ मुद्दा भाजपच्या अंतर्गत गोटात नक्कीच सतावत राहील. पक्ष कोणताही असो, त्याबाबतीत वैचारिक मतभेद असू शकतात. परंतु, एका कार्यकर्त्याचे त्याच्या पक्षाशी कौटुंबिक नाते असते. त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला वार्यावर सोडणार्या पक्षाला इतर कुटुंबांनी का जवळ करावा, असा प्रश्न निर्माण होईल. पवार कुटुंब आर. आर. पाटलांच्या कुटुंबाकडे का धावले याचे उदाहरण बारकाईने पाहावे. कारण तुम्ही कार्यकर्त्याच्या मागे त्याची सावली झाला नाहीत तर तो तुमचा शिलेदारही होणार नाही.