सच्चिदानंदरूपी भगवान श्रीकृष्णाचे चिंतन म्हणजे भागवत कथा

0

मुक्ताईनगर : सच्चिदानंदरूपी श्रीकृष्ण परमात्म्याचे चिंतन केल्याने मनुष्याचे त्रिविध ताप आणि दोष नष्ट होतात. याच सच्चिदानंदरूपी श्रीकृष्णाचे चिंतन म्हणजे श्रीमद् भागवत कथा होय. जीवाचे दुःख निवारण करून त्याच्या उद्धाराचे साधन भागवत कथा असल्याचे आयुष्यात एकदा तरी मन लावून कथा ऐकण्याचे आवाहन श्रीकृष्ण कृपामूर्तीविश्‍वेश्‍वदास महाराज वैष्णव अयोध्या यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथे केले. मेहूण येथे रविवार 18 पासून संत सोपानकाका समाधी सोहळ्यास सुरूवात झाली.

परमसुखाची प्राप्ती भागवत कथेने शक्य
प्रारंभी दिपप्रज्वलन करण्यात आले. वीणा व ग्रंथ पूजन रामराव महाराज यांनी तर कलश पुजन संजय महाराज देहूकर यांनी केले. सकाळी रवींद्र महाराज यांचे कीर्तन झाले. दुपारच्या सत्रात श्रीमद् भागवत कथेचे वाचक विश्‍वेश्‍वरदास महाराज वैष्णव म्हणाले की, जीवाच्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती भागवत कथेने होते. भक्तीशास्त्रात अठरा पुराणांपैकी एक उत्तम भक्तीशास्त्र आहे. एक ते नऊ स्कंधात कर्मयोग, दहाव्या स्कंधात भक्तीयोग, अकराव्या स्कंधात ज्ञानयोग आणि बाराव्या स्कंधात उपसंहार आहे.

कथाश्रवणाने 21 पिढ्यांचा होतो उध्दार
मृत्युलोक हा कर्मलोक असून कर्म करून भक्ती करावी आणि भक्तीचे ज्ञानात कसे रूपांतर होते हे भागवत कथा शिकवते. कथाश्रवणाने श्रवण करणार्‍याचाच नव्हे तर त्यांच्या पित्याकडील एकवीस आणि मातेकडील एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो. सत्व,रज,तम हे तीन ताप आणि आध्यात्मिक, आदिदैविक, आधीभौतिक हे तीन दोष दूर करण्याचे सामर्थ्य भागवत कथेत असल्याचेही वैष्णव महाराज यांनी सांगितले.

असे आहेत कार्यक्रम
सायंकाळी हरीपाठ व रात्री बाळासाहेब महाराज यांचे कीर्तन झाले. सप्ताहात काकडा आरती, मुक्ताईस्तोत्र, महालक्ष्मी कुबेर महायज्ञ, होमहवन, सकाळचे कीर्तन, दुपारी संगीतमय श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ व रात्री किर्तन होत आहे. सोमवार 19 रोजी रामकृष्ण महाराज व उमेश महाराज, 20 रोजी अंकुश महाराज व भास्करगिरी महाराज, 21 रोजी गोपाळ महाराज व चैतन्य महाराज, 22 रोजी शिवाजी महाराज व डॉ. वेणूनाद महाराज, 23 रोजी गोविंद महाराज व प्रकाश महाराज, 24 रोजी ज्ञानेश्‍वर माऊली व प्रकाश महाराज, 25 रोजी भरत महाराज व रामभाऊ महाराज यांची कीर्तने होणार असून 26 रोजी सकाळी 10 ते 12 गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत क्षेत्र आळंदी यांचे काल्याचे किर्तन होईल. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन वारकरी समितीने केले आहे.