पिंपरी-चिंचवड:लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, पर्यावरणपूरक कागदी मखर, छोट्या-छोट्या दिव्यांच्या माळा, प्लॅस्टिकची फुले, हिटलॉन शीट, क्रिस्टल माळा, चायनीज माळा व फुले, फुलांचे विविध प्रकार एक ना अनेक नवनवीन प्रकार बाजारपेठेत आले आहेत
खास करुन गणपतीसाठी पडद्यातील फोल्डिंगच्या मखराला जास्त मागणी आहे. 900 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत ही पडद्यांची फोल्डिंग मखर बाजारात आहेत. भगवा आणि पांढऱ्या रंगाच्या पडद्यांना विशेष मागणी आहे. यावर्षी बाजारात सध्या गणपतींच्या आरासीसाठी विविध डिझाईनचे पडदे आले आहेत. आकर्षक रंगातील आणि विविध आकारातील पडद्यांना सजावटीसाठी विशेष मागणी आहे. गणपतीच्या मखरासाठी पडद्याच्या झालर, गेट कमान, छत आणि झुंबरांना विशेष मागणी आहे. यावर्षी गणपतीच्या मखर सजावटीसाठी पडद्यांचा जास्त ट्रेंड दिसून येत असल्याचे पिंपरीतील विक्रेते महालक्ष्मी दुकानाच्या कांचन सुखवाणी यांनी सांगितले.
तसेच गणपतीसाठी खास फेटा, नक्षीकाम केलेले उपकरणे, विविध प्रकारचे हार, मोत्यांचे हार, मुकुट, रंगीत खडे आणि क्रिस्टल्सने बनविलेले आकर्षक दागिने बाजारात विक्रीसाठी आले आहेत. निसर्गप्रेमींसाठी खास इको फ्रेंण्डली मखर, सिंहासने बाजारात दाखल झाली आहेत. कापडी पिशव्यांची मखरे, लाकडी सिंहासने, नक्षीदार आरास यामुळे पर्यावरणपूरक सजावटीसाठी या वस्तूंना मोठी मागणी होत आहे. मखर 400 ते 3000 रुपये, हार 60 ते 250 रुपये, छोटी कलात्मक झाडे 25 ते 300 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सजावटीच्या साहित्याच्या किमतीमध्ये सुमारे 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरोघरी गणेश आगमनाची तयारी तर सुरूच आहे, पण यावर्षी आरास कशी आकर्षक करता येईल याबाबत अनेक तरुण मंडळांमधूनही मंडप उभारणी तसेच सजावटीसाठीची तयारी सुरू झाली आहे.