सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

0

जळगाव । झिपरूअण्णा नगरात सुरू असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर गुरूवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास प्रशिक्षणार्थी डिवायएसपी धनंजय पाटील यांच्या पथकाने अचानक छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी सट्टा खेळतांना 21 जण मिळून आली असून त्यांना पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पथकाने 1 लाख 15 हजार रूपयांची रोकड, चार मोटारसायकली, तसेच सट्टयाचे साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे मात्र सटोड्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या 21 जणांवर शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्यावर झाली कारवाई
सट्टा अड्डा मालक खंडू, निंबा पाटील, थापा केशी, अशोक भालेराव, संजय कोळी, घनश्याम पाटील, पिंताबर तायडे, राजू पाटील, नितेश नेरकर, दिपक पवार, नारायण जाधव, संदिप कोळी, समाधान चौधरी, शेख रौफ, नारायण कोलते, उस्मान अली, जगन्नात सोनवणे, कलिम खान इनायत खान, संतोष गायकवाड, अमोल श्रीकृष्ण अशांना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पोलिस कर्मचारी गणेश गव्हाळे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

21 जणांना घेतले ताब्यात

नेरीनाका परिसरातील स्मशानभुमीच्या मागील बाजुस असलेल्या झिपरूअण्णानगरातील एका मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडममध्ये सट्टा-जुगार सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी डिवायएसपी धनंजय पाटील यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी डिवायएसपी धनंजय पाटील व त्यांच्या पथकातील गणेश गव्हाळे, प्रकाश चव्हाण, सचिन साळुंखे, महेश पवार, प्रशांत पाटील, जितेंद्र सोनवणे, रामेश्‍वर ताटे, गणेश नेटके, अनिल कांबळे अशांनी गुरूवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास झिपरूअण्णा नगरात जावून पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर अचानक छापा मारला. यात खंडू महाराज (पुर्ण नाव माहित नाही) हा सट्टा खेळतांना व खेळवतांना मिळून आला. यासोबतच त्या ठिकाणी 20 जण सट्टा खेळतांना पथकाला मिळून आले. पोलिसांनी छापा मारताच सटोड्यांची धावपळ सुरू होताच पथकातील कर्मचार्‍यांनी त्यांना पकडले.

रोकडसह चार मोटारसायकली जप्त
प्रशिक्षणार्थी डिवायएसपी धनंजय पाटील यांनी छापा मारल्यानंतर 21 सटोड्यांना ताब्यात घेतले. सटोड्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून 1 लाख 15 हजार रूपयांची रोख रक्कम तसेच 21 मोबाईल यासह (एमएच.19.सीएच.7017, एमएच.19.टी.0531, एमएच.19.डीएक्स.78, एमएच.19.सीके.9894) चार मोटारसायकली, सट्टा खेळण्याच्या साहित्य मिळुन आले असून ते पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली असून सट्टा खेळणार्‍यांचे धाबे दणाणुन गेले आहे. सट्टा मालक यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात आली.