इंदापूर : बारामती-इंदापूर राज्यमार्गाच्या कामात ज्यांची घरे जात आहेत त्यांना शासनाने तीन-तीन गुंठे जागा द्यावी. जोपर्यंत शेतकर्यांच्या जमिनींचा मोबदला किती मिळणार, हे ठरला जात नाही. तोपर्यंत सणसर परिसरात मार्गाच्या कामाला सुरुवात करू नये, असा ठराव ग्रामस्थांच्यावतीने विशाल निंबाळकर यांनी मांडताच ग्रामसभेत या ठरावाला एकमताने पाठिंबा दिला. विविध विषयांवर गाजलेल्या या ग्रामसभेत हा मुद्दा चर्चेचा ठरला.
सणसर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच संध्या काळे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी निंबाळकर, सचिन भाग्यवंत, नाना निंबाळकर, श्रीनिवास कदम, रविंद्र खवळे, यशवंत पाटील, गजेंद्र मोरे तसेच महिला सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, काँग्रेसचे संग्रामसिंह निंबाळकर यांनी ‘गावात आमदार निधीतून किती रक्कम आली,’ असा खोचक प्रश्न विचारला. यावर सचिवांनी असा निधी आलाच नसल्याने सांगितले. तर मुस्लीम समाजाच्या दफनभूमीसाठी दोन एकर व वेताळ बाबा मंदिरासाठी चार एकर जागा परिसरातील गायारानमधील द्यावी, असा ठराव सोमनाथ गुप्ते यांनी मांडताच शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन सचिन भाग्यवंत यांनी दिले.
अनेक ग्रामस्थांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, अशा ग्रामस्थांना जागा घेण्यासाठी शासनाची 50 हजार रुपये अनुदानाची योजना आहे. या योजनेतून ग्रामस्थांना दोन वर्षात लाभ तसेच ग्रामपंचायत उत्पन्नातील तीन टक्के रक्कम अपंगाना खर्च करावी लागते, अशी किती रक्कम ग्रामपंचायतीने दोन वर्षात खर्च केली, असा सवाल गुप्ते यांनी करताच यावर सचिव निरुत्तर झाले. यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य मंडळच बरखास्त करण्याचा ठराव पिंटू गुप्ते यांनी मांडला. याचवेळी राजू खटके यांनी सणसरचे ओढाखोलीकरण लगतचा रस्ता तसेच शेलार, सोनावणेवस्ती रस्ता, मुलाणीवस्ती रस्ता अशी 50 वर्षांपासून रखडलेली सार्वजनिक कामे पूर्ण केल्याबद्दल सरपंच, संध्या काळे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, सदस्य सचिन भाग्यवंत व सर्व सदस्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडून वातावरण फिरवीले. सणसर ग्रामपंचायतचे काम उत्तम असल्यानेच ही सर्व समाजहिताची कामे सर्वांना बरोबर घेऊन करता आली असल्याचे उपसरपंच निंबाळकर यांनी सांगितले.
सणसर भूमी अभिलेख कार्यालयाबाबत बापुजी निंबाळकर यांनी तक्रारी मांडल्या तसेच गायरान जमिनीबाबत मालोजीराव गायकवाड यांनी प्रश्न विचारले. अजित सोनवणे यांनी पथदिव्यांतील कामांबाबत प्रश्न मांडले. यावेळी भगवान निंबाळकर, पार्थ निंबाळकर, बाळासाहेब सोनवणे, औदुंबर निंबाळकर आदींनी विविध विषयांवर आपली मते मांडली. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी नरसिंग कदम, उपाध्यक्षपदी सत्यजित काळे यांची ग्रामसभेत एकमुखाने निवड करण्यात आली.