सणसवाडी पाझर तलावात पाणी सोडण्याची मागणी

0

सणसवाडी । चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून सणसवाडी पाझर तलावात गेल्या दोन महिन्यांपासून पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्वरित पाणी सोडले नाही तर, आंदोलन घडण्याचा इशारा शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती मोनिकाताई हरगुडे यांनी दिला आहे.

सणसवाडी येथे दोन पाझर तलाव असून ते कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी गेल्या दोन महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. गेल्या महिनाभरापासून याच कालव्यातून शिरूरसाठी पाणी सोडण्यात येत आहे. परंतु सणसवाडीला पाणी दिले जात नाही. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाझर तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती मोनिकाताई हरगुडे यांनी शिक्रापूर येथील चासकमान पाटबंधारे विभागीय कार्यालयात चासकमानचे शाखा अभियंता आर. डी. भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्वरित पाणी सोडले नाही तर 26 तारखेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. माजी सरपंच नवनाथ हरगुडे, माजी उपसरपंच शिवाजीराव दरेकर, योगेश दरेकर, अमोल हरगुडे, गोरख हरगुडे, सचिन दरेकर या बरोबर ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. चासकमान पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे.