सणसवाडी । सणसवाडी उद्योग नगरीच्या सरपंचपदी रमेश सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबाबतची माहिती निवडणूक प्रक्रिया अधिकारी मंडल अधिकारी डी. व्ही. कावळे यांनी परीपत्रकाद्वारे दिली.
सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा कानडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंचपदासाठी केवळ सातपुते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोथ निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी डी. व्ही. कावळे, ग्रामसेवक बी. एच. पवने यांनी दिली. यावेळी कानडे यांनी नवनिर्वाचित सरपंच सातपुते यांचा सत्कार केला. उपसरपंच राहुल दरेकर, बाबासो दरेकर, युवराज दरेकर, नवनाथ भुजबळ, नवनाथ हरगुडे, सुनीता दरेकर, ज्योती हरगुडे, नीता हरगुडे, शशिकला सातपुते, गणेश कानडे, शिवाजी दरेकर आदींसह विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच रमेश सातपुते हे गेली 15 वर्ष कामगार संघटनेचे प्रतिनिधी आहेत. सातपुते यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.