भुसावळ- रमजान ईद व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भुसावळात मंगळवारी बाजारपेठ पोलिसांसह सशस्त्र दंगा काबु पथकाने शहरातील विविध भागातून पथसंचलन करीत जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली. जळगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पोलिस विभागातर्फे खडका रोड भागातील रजा टॉवर ते रेल्वे स्थानक चौकापर्यंत दंगा काबू पथकाने पथसंचलन करीत शक्तीप्रदर्शन केले. या पथसंचलनात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास पवार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह अन्य दुय्यम अधिकारी, 32 पोलीस कर्मचारी, एक आरसीपी प्लाटून, 32 पुरूष होमगार्ड तसेच पाचमहिला होमगार्ड सहभागी झाले होते. सुमारे सव्वा तासानंतर या पथसंचलनाचा रेल्वेस्थानक चौकात समारोप झाला.
रावेर शहरातही रूट मार्च
रावेर- रमजान ईदसह सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील, शेख यांच्या नेतृत्वाखाली रावेर शहरातून मंगळवारी रूट मार्च काढण्यात आला. रावेर शहरातील मेन रोड, चावडी भाग, नागझिरी भाग, प्रताप व्यायाम शाळा, शिवाजी व्यायाम शाळा, भोई वाडा, अंबिका व्यायाम शाळा आदी परीसरातून पोलिसांनी पथसंचलन केले. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस, एसआरपी, होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले.