सफाई, आरोग्य कर्मचार्यांसह पौरोहित्य करणारे गुरुजी, वृत्तपत्र विक्रेत्यांचा दिवाळीनिमित्त विशेष सन्मान
पुणे : समाजातील सफाई, आरोग्य कर्मचार्यांसह पौरोहित्य करणारे गुरुजी, वृत्तपत्र आणि दूध विक्रेते हे सर्वच घटक सामान्यांच्या जीवनाला आकार देणारे शिल्पकार आहेत. दैनंदिन जीवनात यांनी दिलेल्या सेवांचा लाभ घेऊन आपण आपल्या गरजा भागवत असतो. आपला समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. मात्र, या उत्सवांमध्ये आपण या घटकांचा विचार न करता केवळ आपल्या कुटुंबाचा विचार करतो. त्या घटकांच्या पाठीवर मायेची थाप देण्याकरीता सणांमध्ये देखील त्यांचा विचार करणे गरजेचे आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केले.
वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे यांच्यावतीने दिपावलीनिमित्त घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात सफाई, आरोग्य कर्मचार्यांसह पौरोहित्य करणारे गुरुजी, वृत्तपत्र विक्रेत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेविका निलीमा खाडे, डॉ. अजय दुधाणे आदी उपस्थित होते. भेटवस्तू, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उपक्रमाचे यंदा 3 रे वर्ष आहे.
प्रगतीसाठी सत्काराची गरज
योगेश गोगावले म्हणाले, देशाच्या भावी प्रगतीसाठी संस्कारांची गरज आहे. समाजाच्या प्रगतीसाठी काम करणारे सर्व घटक हे संस्कारदूत आहेत. समाजाने त्यांचे ऋण मान्य करायला हवे. तसेच समाजामध्ये सातत्याने सेवा देणार्यांचा सन्मान देखील करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. निलीमा खाडे म्हणाल्या, समाजात स्वच्छता कर्मचार्यांचे योगदान मोठे आहे. आरोग्य आणि सफाई कर्मचारी हे उत्तम काम करीत आहेत. मात्र, व्यसनाच्या जाळ्यात अडकलेल्या काही बांधवांना
बाहेर काढण्याकरीता आपण प्रयत्न करायला हवे.
दिवाळी जिव्हाळ्याचा सण
डॉ.अजय दुधाणे म्हणाले, दिवाळी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्या- चा सण आहे. जात, धर्म, पंथ यांसारखे भेदाभेद विसरुन प्रत्येकजण दिवाळीचा सण एकत्रितपणे साजरा करतो. त्यामुळे समाजात प्रत्येक घटकासाठी काम करणार्यांचा सन्मान करण्यात आला. असेही त्यांनी सांगितले. अनिरुद्ध हळंदे यांनी सूत्रसंचालन केले. महेश वाडेकर यांनी आभार मानले.