सण-उत्सव शांततेचे श्रेय रावेरकरांना

0

पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे ; रावेर शहरात पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन

रावेर- रावेर शहर व तालुक्यात सण-उत्सव यंदा शांततेत पार पडल्याचे श्रेय रावेरकरांना असून अशाच पद्धत्तीने नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले. रावेर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण झाल्याने उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कराळे म्हणाले की, वातावरण चांगले असेल तर पोलीस ठाण्यात येणारा तक्रारदारही मोहित होवून त्याचा चिडचिडेपणा कमी होतो शिवाय पोलीस कर्मचार्‍यांंना त्याचा फायदा होतो. नागरीकांचे अनमोल सहकार्य व पोलिस निरिक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या कल्पक व सकारात्मक दृष्टीकोनामुळे पोलिस स्टेशन इमारतीचे नूतनीकरण शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, पद्माकर महाजन, नगरसेवक प्रल्हाद महाजन, असदउल्ला खान, शिरीष वाणी, बाळु शिरतूरे, ज्ञानेश्वर महाजन, हरीष गणवानी, एम.ए.खान, अशोक शिंदे, सचिन जाधव, डॉ.एस.आर.पाटील आदींची उपस्थिती होती.

पोलीस निरीक्षकांच्या कार्याचा गौरव
संवेदनशील रावेर पोलिस स्टेशनला अनेक अधिकारी आले व गेले परंतु याला पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे अपवाद ठरले. त्यांनी रावेरकरांमध्ये सामाजिक सलोख्यातून कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवलाच सोबत लोकवर्गणीतून पोलिस ठाण्याचा केलेला काया-पालट कौतुकास्पद असल्याचे पोलीस अधीक्षक म्हणाले.

विविध गुन्ह्यांमध्ये घट
पोलिस स्टेशन प्रमाणेच पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, सहाय्यक पोलीस नरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक दीपक ढोमने यांच्यासह पोलिस टीमने कायदा व सुव्यवस्थेवरील आपली पकड कमी होवू दिलेली नाही. त्यांच्या कारकिर्दीत रावेरकरांना अनेक प्रकारच्या शिस्तीचे दर्शन घडले त्यामध्ये प्रमुख पेट्रोलिंग, बेशिस्त वाहतूक, किरकोळ हाणामारी, चोरींच्या गुन्ह्यांना रोखण्यासोबत सामाजिक सलोखा राखण्यात यश आले आहे.

पोलिस ठाण्याचा केला कायापालट
लोकवर्गणीतून पोलिस स्टेशनच्या इमारतीचा पुर्ण काया-पालट करण्यात आला. पोलिस स्टेशनच्या आवारात पाण्याचा कारंजा व वृक्ष लागवड करण्यात आली. नागरीकांसाठी बेंच, तालुक्यातील प्रसिध्द स्थळांचे देखने फोटो, भिंतीवरील रंगरंगोटी, परीसरात सीसीटीव्ही, सुसज्ज हाय-टेक इंटरनेट प्रणाली, स्वतंत्र पोलिस कॅबीन, गोपनीय विभागाची दुरुस्ती, नागरीकांसाठी आर-ओ पाण्याची सुविधा, कर्मचार्‍यांसाठी कुलर आदी बदल पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी शासनाचा कोणताही निधी न घेता केला आहे.

निम्मे शहरावर सीसीटीव्हीची नजर
संवेदनशील रावेर शहरावर पोलिस स्टेशनतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख नागझिरी, पाराचा गणपती, थडा भाग, मेन रोड, अफू गल्ली, स्टेशन रोड, शिवाजी चौकासह इतर ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तालुक्यातील अहिरवाडी गावात देखील सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.