मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार; वसुलीला देणार गती
जळगाव: ळगाव महानगरपालिकेत आयुक्त म्हणून काम करायची संधी मिळाली याचा आनंद आहे. आशिया खंडात जळगाव महानगरपालिकेची 17 मजली उंच इमारत आहे. त्यामुळे शहरातील विकासकामेही त्याच उंचीने अर्थात गतीने व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून मार्गक्रमण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे नवे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
विभाग प्रमुखांकडून जाणून घेतली माहिती
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेवून त्यांच्याकडून विभागनिहाय माहिती जाणून घेतली. महापौर भारती सोनवणे यांची देखील भेट घेवून शहाराच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. तसेच जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांची देखील भेट घेतली.
उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार
मुलभूत सुविधा मिळणे या नागरिकांच्या माफक अपेक्षा असणे साहजिकच आहे. उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत शोधणे आवश्यक आहे. मालमत्ता कर हे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत असून वसुलीला गती देणार असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले. मनपाशी निगडीत जे काही प्रश्न प्रलंबित आहेत.ते देखील समजून घेवून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
शासनातर्फे विकासकामांसाठी मिळणार्या निधीचा वापर निर्धारित वेळेत वापर करुन प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे. जळगाव शहारात सध्या सुरु असलेल्या अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजना हे लवकरात लवकर पूर्ण कसे करता येईल आणि नागरिकांना मुलभूत सुविधा कशा उपलब्ध करुन देता येईल यावर भर राहिल असेही आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच स्वच्छतेचा प्रश्न देखील मार्गी लावणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.