सतरा लाखांचे 94 स्मार्टफोन लंपास

0

वाघोली। साई सत्यम गोदाम परिसरात स्टोरवेल गोदामातून सॅमसंग कंपनीचे 17 लाख 42 हजार किमतीचे 94 स्मार्टफोन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

अभिजित नरेंद्र धानोरकर (रा. वडगावशेरी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघोली गावाच्या हद्दीमध्ये साई सत्यम गोदाम परिसरात सॅमसंग मोबाईल कंपनीचे स्टोरवेल गोदाम आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी सॅमसंग कंपनीचे एस 8, प्राईम, टबलेट व इतर असे एकूण 94 स्मार्टफोन चोरून नेले. याप्रकरणी लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत.

याच गोदाम परिसरामध्ये नोव्हेंबर 2016मध्ये सुरक्षारक्षकाला मिठाईतून गुंगीचे औषध देऊन चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी शिवाजी काजळे या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. तर मार्चमध्ये सहकार्‍याच्या वादातून कृष्णा जाधव याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. याच गोदामात अशा घटना वारंवार घडत असून चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. चोरीच्या तपासात धागेदोरे हाती लागले आहेत. लवकरच चोरटे पोलिसांच्या ताब्यात असतील, असे आश्‍वासन पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिले.