सतीश कुमार, राहुलची सुवर्ण कामगिरी

0

गोल्डकोस्ट । भारतीयांसाठी शनिवारची सकाळ खूशखबर घेऊन आली आहे. 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसर्‍या सुवर्णपदकाची कमाई केली आहे, तर आर. व्ही. राहुलने 85 किलो वजनी गटात बाजी मारत भारताची सुवर्णपदकाची संख्या 4 वर नेली. पुरुषांच्या 77 किलो वजनी गटात भारताचा वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने सुवर्णपदक पटकावले. सतीशने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. सतीशने स्नॅचमध्ये 144 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये उचललं 173 किलो वजन उचलले. 25 वर्षीय सतीशने 2014 मधील ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरू आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतले हे पाचवे पदक ठरलं आहे.

विशेष म्हणजे ही पाचही पदके वेटलिफ्टर्सनीच पटकावली आहेत. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. सतीश शिवलिंगम हा एका सुरक्षा रक्षकाचा मुलगा आहे. सतीशला वेटलिफ्टिंगचे शिक्षण त्याच्या वडिलांकडून मिळाले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि सतीशने वेटलिफ्टिंगमध्ये करिअर घडविण्याचे ठरविले. त्याचे वडील हे सुरक्षा रक्षक आहेत. सतीशचे वडील एका विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत आहेत. तर सतीश चेन्नईमध्ये रेल्वेत क्लार्कची नोकरी करतो. सतीशचा जन्म तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये झालाय. सतीशने याआधी दोन राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून स्वतःची वेगळ ओळख निर्माण केली आहे तसेच त्याने आशियायी स्पर्धेही चांगली कामगिरी केली होती. त्याने भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एका मिनिटात पलटली बाजी
राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी सामना 2-2 बरोबरीने सुटला. पाकने खेळाच्या शेवटच्या मिनिटात पेनल्टी कॉर्नरवरुन गोल करुन सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट खेळ करणार्‍या भारताला एक चूक महागात पडली. सुरुवातीपासूनच भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड ठेवली. भारताकडून 13 व्या मिनिटाला 18 वर्षीय दिलप्रीत सिंहने पहिला गोल केला. त्यानंतर पेनल्टी कॉर्नरवरुन दुसरा गोल हरमप्रीत सिंहने 19 व्या मिनिटाला केला, तर पाकिस्तानकडून इरफान जूनियरने 38 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर 60 व्या मिनिटाला अली मुबाशरने पेनल्टी कॉर्नरवरुन गोल करत पाकिस्तानची अब्रू वाचवली. या गोलनंतर पाक संघाने पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, भारतीय संघाने त्यांचा चांगला प्रतिकार करत पाकला झुंजत ठेवले. भारत पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच दोन्ही देशांच्या प्रतिष्ठेचा विषय असतात.

दीपककडे मोबाइलही नाही
राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरने कांस्य पदक पटकावले. त्याला 69 किलो वजनीगटात हे पदक मिळवण्यात यश आले. भारताचे हे वेटलिफ्टिंगमधील चौथे मेडल ठरले. मीराबाई चानू आणि संजिता चानूने भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली, तर गुरुराजाने रौप्यपदक मिळवून दिले. यानंतर दीपकने केलेली ही कामगिरी निश्‍चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी यावेळी वेटलिफ्टर्सने शानदार सुरुवात करुन दिली. कांस्य पटकावणार्‍या दीपक लाथर भारतातील चर्चित खेळाडू ठरलाय. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदार्पण करणारा हरियाणाचा अवघ्या 18 वर्षांचा दीपक एकूण 295 किग्रॅ (136 किग्रॅ + 159 किग्रॅ) भार उचलून तिसर्‍या स्थानावर राहिला. मी आत बसलो होतो आणि आशा करत होतो की प्रतिस्पर्धी लोअने आपल्या प्रयत्नात अयशस्वी ठरवा. मला माहीत आहे की कुणासाठी वाईट प्रार्थना करणं योग्य नाही, परंतु असे करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही असे लाथारने नंतर हसता हसता म्हटले. मी आज खूप खूश आहे. हा क्षण शानदार आहे. परंतु, आपण 2020 ओलम्पिकपर्यंत कोणताही कौतुकसोहळा साजरा करणार नाही, असेही दीपकने यावेळी स्पष्ट केले. दीपककडे मोबाईलही नाही… याचे कारण सांगताना तो म्हणतो, मी वडिलांशीही गेल्या तीन महिन्यांपासून बोललो नाही. कारण मी मोबाईलच माझ्यासोबत ठेवत नाही, फोन जवळ राहिल्यानं लक्ष दुसरीकडेच भरकटते… कॉमनवेल्थ पदक जिंकल्यानंतर आता दीपकचं लक्ष लागलंय ते 2020 साली होणार्‍या ऑलिम्पिकवर.