गप्पांचीपहिली फेरी संपल्यावर प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. आप कब तक राष्ट्रपती का उम्मीदवार का चयन करोगे?, असा प्रश्न एका वरिष्ठ पत्रकाराने विचारला- त्यावर अमित शहा त्वरेने उतरले भाईसाब, ना चुनाव आयोग को जल्दबाजी है ना हमे! आप काहे उम्मीदवार का नाम ढुंढने लगे हो। सब्र करो वक्त आने दिजिए, हम आपको बताएंगे। त्यावर दुसरा एक पत्रकार मित्र म्हणाला, अध्यक्ष जी, आप बताईये, राष्ट्रपति चुनाव में उमीदवार जीतने के लिए 25,000 वोट कम पड रहे हे, वो कहाँ से लायेंगे। स्मितहास्य करत अमित शहा म्हणाले, महोदय, बहुमत तो हमारे पास है, हमारा उम्मीदवार 70 प्रतिशत वोट पायेगा, आप सब देखते रह जायेंगे । असं म्हणून अमित शहा उठले आणि दुसर्यात पत्रकारांच्या समूहास भेटायला गेले.
एवढं मात्र निश्चित होत की राजधानीत वातावरण शांत शांत असलं, तरी ही पडद्यामागे बरंच काही शिजतं होतं. मोदी शहा जोडगोळीची रणनीती राजधानीत कोणालाच कळत नाही. त्यामुळे जी गुप्त रणनीती (अंडरकव्हर ऑपरेशन) चालते. त्याची भणक ही स्वकीय आणि विरोधकांना लागत नाही. भाजपने पहिल्यांदा तामीळनाडू आणि मग बिहार या दोन राज्यांत मिशन दोस्ती चालू केली.
नितिश नमो जुगलबंदी ते प्रेम
2009च्या लोकसभा निवडणूक पराभवानंतर निवडणूक जिंकवून देण्याचा नेत्याला अभाव होता. वाजपेयी – आडवाणी यांच्यानंतर कोण? हा प्रश्न भाजपनेत्यांसमोर होता. अशा परिस्थितीच्या घटकपक्ष असलेला जनता दल युनायटेडचा नेता स्वत:ला राष्ट्रीय पटलावरील विरोधी पक्षाचा चेहरा बनू पाहत होता. स्वच्छ प्रतिमा, सुशासन बाबू आणि जंगलराजचा मुक्तिदाता ही प्रतिमा नितीशकुमारांनी जपली होती. ती त्यांना राष्ट्रीयस्तरावर कामास येणार होती. त्या दृष्टीने नितीशकुमारांनी पाऊले उचलायला सुरुवात केली.
घटकपक्षांची एक जनसभा 2009 मध्ये लुधियानामध्ये आयोजित केली होती. त्या सभेस मोदी येणार आहेत. हे कळल्यावर नितीशकुमारांनी जाणं टाळलं. जिथं मोदी तिथं मी नाही ही भूमिका घेत. मोदीच्या समोरील विकल्प या रूपात नितीशकुमार स्वत:ला पाहू लागले.
2012 च्या विधानसभा विजयानंतर नरेंद्र मोदीनी मोर्चा दिल्लीकडे वळवला. त्यावेळी लालकृष्ण आडवाणींनी मोदींचे तंत्र रोखण्याचे प्रयत्न केले. त्यास नितीश कुमारांनी साथ दिली. जून 2013 मध्ये गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीत नरेंद्र मोदींना राष्ट्रीय प्रचारप्रमुख करू नये म्हणून नितीशकुमार- आडवाणींनी भाजपनेत्यावर दबाव आणला. पण त्याला न जुमानता राष्ट्रीय कार्यकारिणीने मोदींना प्रचार समितीचे प्रमुख केले. गोव्यात मोदींच्या नावाची घोषणा होताच. पाटण्यामध्ये नितीश कुमारांनी भाजपच्या 11 मंत्र्यांना बरखास्त केलं. सतरा वर्षांची भाजप जेडीयू (पूर्वाश्रमीची समतापार्टी) यांची आघाडी तोडली. येथूनच नितीशकुमार उघडपणे मोदीचा विरोधक म्हणून स्थापित झाले. नितीश नमो यांची राजकीय शत्रुतेचं पर्वही सुरू झाले.
बघता- बघता लोकसभा निवडणूक आली. कोणालाही सोबत न घेता नितीशकुमारांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत जनता दल युनायटेडचा दारुण पराभव झाला. त्यांचं संख्याबळ 20 वरून थेट 2 वर घसरलं. लालूंच्या राजदला 4 जागांवर समाधान मानावं लागल, तर भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या रामविलास पासवान यांना सहा जागा मिळाल्या. निकालाचा झटका नितीशकुमार यांना बसला. इथूनच नितीशचा प्रवास कट्टर विरोधक लालूप्रसाद यादव यांच्या प्रेमाकडे सुरू झाला.
लालूप्रसाद आणि नितीशकुमार यादव या दोघांना ही एकत्र आल्याशिवाय टिकाव लागणार नाही, याची जाणीव झाली. मोदी हा दोघांचा समान शत्रू असल्यामुळे विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊले पडू लागली. तब्बल वीस वर्षांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद हे हाजीपूर येथील एका कार्यक्रमासाठी मे 2015 मध्ये एका व्यासपीठावर आले. इथूनच महाआघाडीची मुहूर्तमेढ रोवली.
निवडणूक जवळ येताच नितीशकुमारांनी प्रशांत किशोर यांना आपल्या जाळ्यात ओढले. काँग्रेस स्वतंत्र लढली तर आपल्याला फटका बसेल याची जाणीव होताच. त्यांनी महाआघाडीत काँग्रेसलाही घेतले. मोदींचा सत्तेचा अश्वमेध घोडा राजद-जदयू- काँग्रेसने रोखला, याच श्रेय नितीशकुमारांची रणनीतीच आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसर्या. दिवशीच नीतीशकुमार काही मोजक्या सहकार्यांनसमवेत 7 सर्क्युलर रोड, पाटणा या निवासस्थानी गप्पा मारत होते. त्यात सहकार्यांाना उद्देशून नितीश म्हणाले- आता आपण भाजपसोबत नाही आहोत. तरी ही मी दावा करू शकतो की भाजपपेक्षा चांगला सहयोगी मित्रपक्ष कोणी असू शकत नाही. नवीन मित्रपक्षासोबत जुळवून घेताना कसरत करावी लागेल. इतके दिवस आपण भाजपसोबत सरकारमध्ये होतो, पण कधीच वाटलं नाही की आघाडी सरकार आहे. मला वाटतं त्याच दिवशी लालू- नितीशच्या घटस्फोटाची पेरणी झालेली होती. अधिकृत घोषणा ही 26 जुलै रोजी करण्यात आली.
सरकारी कामात लालूपरिवाराचा हस्तक्षेप
जदयूने कमी जागा जिंकून ही नितीशकुमारांना मुख्यमंत्री करावे लागले ही लालूप्रसादांची मजबुरी होती. 2010 निवडणुकीत अवघ्या 22 जागा मिळवणार्यास लालूच्या पक्षाला कब्रस्तानामधून थेट सत्तेच्या खुर्चीत पोहोचवण्याचं काम नितीशच्या प्रतिमेने केलं होते. या विजयामुळे लालूच्या वारसांना सत्तेचा आस्वाद चाखायला मिळाला. तेजस्वी- तेजप्रताप यादवांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं, तर मिसा भारती राज्यसभेत पोहोचल्या. एवढं सार राजकीय पुनरुत्थान होऊनही राबडी देवीला मात्र नेहमीच नितीश आमच्यामुळे सत्तेत आल्याची भावना असायची. या जाणिवेतून हळूहळू लालूप्रसादाच्या घरूनच प्रशासनाला आदेश सुटू लागले.
नितीशकुमारांच्या सरकारमध्ये लालू राबडी हे दोन सत्ताबाह्य केंद्र निर्माण झाले. लालू समर्थकांना अडचणीचे ठरणारे आदेश फिरवले जाऊ लागले. नितीश यांचा एकेरी उल्लेख सर्रास केला जाऊ लागला. या सर्वाचा कळस सप्टेंबर 2016 मध्ये झाला. सीवानला पोहोचल्यावर शहाबुद्दीनने नितीश कुमारवर निशाना साधला. ’नीतीशकुमार तो परिस्थितीओं के मुख्यमंत्री है। आनेवाले चुनाव में सबक सिखायेंगे।’ या वक्तव्यावर लालूप्रसादांकडून कुठलीच प्रतिक्रिया आली नाही. नितीशकुमारांनी ही कुठली ही आग पाखड न करता कडू घोट गिळून टाकला.
नितीशचा मोदी प्रेमाचा उमाळा
शहाबुद्दीन प्रकरणानंतर नितीशने राजकीय भूमिका बदलायला सुरुवात केली. सर्वात पहिली भूमिका सर्जिकल स्टाइक प्रकरणात घेतली. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या मुद्द्यावर भाजपला टीकेच लक्ष्य करत असताना नितीश कुमारांनी मोदींच समर्थन केलं. 8 नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या मुद्द्यावर गदारोळ माजलेला असताना नितिश उघडपणेे मोदीच्या बाजूला उभे राहिले. यानंतर नरेंद्र मोदी आणि नितिश कुमार यांच्या चर्चेला सुरुवात झाली. पडद्यामागे चालेल्या बोलणीमध्ये दुवा होते खासदार भूपेंद्र यादव. नितीशकुमारांना हव्या असलेल्या गोष्टी हळूहळू मोदी दरबारात मान्य होऊ लागल्या. इथूनच नितीश आणि नमो यांच्या दोस्तीला सुरुवात झाली. याची प्रचिती 5 जानेवारीला पाटणा येथील गुरू गोविंद सिंहांच्या 350 व्या जयंती कार्यक्रमात आली. या कार्यक्रमात मोदीने नितीशकुमारांच्या दारूबंदीची स्तुती केली, तर नितिश कुमारांनी नोटाबंदी हा ऐतहासिक निर्णय असल्याच सांगून राजकीय हवापालटाचे संकेत दिले, तरी ही नितिशकुमार उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक निकालापर्यंत थांबले. 11 मार्च 2017 ला उत्तर प्रदेशात भाजपला 325 जागा मिळाल्यानंतर नितीशकुमारांनी भाजप घरवापसीचे मन बनवले.
राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंदांना समर्थन देऊन नितीशकुमारांनी नेता कार्यकत्यांना घरवापसीचा संकेत दिला. त्याच वेळेस सीबीआयने मीसा भारती, तेजस्वी आणि लालू प्रसाद यांच्यावर केलेल्या कारवाईचे निमित्त मिळाले.
बाहुबली नेता सय्यद शहाबुद्दीनला जामीन मिळाला. शहाबुद्दीन समर्थकांनी पटना ते सीवानपर्यंत शक्ती प्रदर्शन केले. दोनशे कारचा काफिला पटन्याहून निघाला. अडीचशे किलोमीटरचा प्रवास करुन सीवानला पोहचला. या प्रवासात जो उत्पात राजद समर्थकांनी मांडला. त्यामुळे जंगलराज परत येतोय की काय ? अशी भीती नागरिकांना वाटू लागली.
– अभिजीत ब्रह्मनाथकर