सत्ताधारीच बनले पालिकेत ठेकेदार; निकृष्ट बंधारा कामाची चौकशी हवी

0

भुसावळ । पालिकेच्या तापी नदीवरील रेल्वेच्या जागेवर बांधण्यात आलेला बंधारा दोन दिवसांपूर्वी निकृष्ट कामामुळे वाहून गेला. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी जनआधार विकास पार्टीने केली आहे. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकानेच या बंधार्‍याचे निकृष्ट पद्धत्तीने काम केल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

बंधार्‍याचे काम करणार्‍या ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करून या कामाचे बिलदेखील अदा करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मूळात तापी नदीला पाण्याचा प्रवाह आला नसताना बंधारा वाहिल्याने कामाचा दर्जा लक्षात येतो. बिल अदा करू नये अथवा केले असल्यास संबंधित सर्व अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर गटनेता उल्हास पगारे यांच्यासह दुर्गेश ठाकूर, हाजी जाकीर सरदार, सिकंदर खान, शेख साजीद, राहुल बोरसे, प्रदीप देशमुख, सचिन पाटील, आशिक खान, नितीन धांडे, रवी सपकाळे, अ‍ॅड.तुषार पाटील, शेख सलीम शेख नादर आदींची नावे आहेत.