माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा सवाल
जळगाव – विरोधात असताना एकटा लढलो, जनतेची भाजपाला साथ आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, याशिवाय दोन मंत्री असूनही आम्ही एकटे का लढू शकत नाही, असा सवाल माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे दुसर्या टर्ममध्ये त्यावेळी 34 नगरसेवक निवडून आणले होते, असेही त्यांनी सांगितले. शून्यातून विश्व निर्माण केले, जे केले ते जनतेसाठीच असे असतानाही संघर्ष करावा लागतो, याचे दुःख असल्याची खंतही एकनाथराव खडसे यांनी आज व्यक्त केली.
सहमत नसेल तर चर्चा करणार
केवळ आरोपांवरून मी राजीनामा दिला. उदय वाघ यांच्यावर गंभीर आरोप झाले असून सीडी फॉरेन्सीक लॅबमधून तपासणी व्हावी, या प्रकरणाची पूर्ण तपासणी व्हावी, तोपर्यंत उदय वाघ यांनी राजीनामा द्यावा व आरोप सिद्ध न झाल्यास पुन्हा पदावर यावे, अशी आपली भूमिका असल्याचे खडसे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष म्हणून उदय वाघ यांनी दोन खासदार, आमदार निवडून आणले भाजपाला वाढविले याबद्दल त्यांचे अभिनंदन मात्र, अमळनेरात ते कोणाला आणू शकले नाही, याचे दुःख वाटते, असा टोलाही खडसे यांनी यावेळी लगावला. मी राष्ट्रवादीत जाणार नाही, असे स्पष्ट करीत पक्षाच्या भूमिकेशी सहमत नसेल तर चर्चा करेल, येत्या 1 ऑगस्टपर्यंत परिवर्तन होणार आहे, असेही खडसे यावेळी म्हणाले.