सत्ताधारी आमदारांचाच मंत्र्यांवर राग !

0

मुंबई:- सध्या भाजपा आणि शिवसेनेचे संबंध व्हेंटिलेटर आहेत. त्यातच शिवसेनेचे आमदार आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना देखील धारेवर धरत असल्याचे चित्र विधानसभेत पाहायला मिळत आहे. आज अर्थसंकल्पाच्या चर्चेत शिवसेनेचे आ. विजय औटी यांनी सेनेच्या मंत्र्यासह सरकारचे उट्टे काढले. तर भाजपाचे आ. उन्मेष पाटील यांनीही आपल्याच भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली.

वाण नाही पण गुण लागला!

आ. विजय औटी यांनी अर्थसंकल्पावर बोलताना जलसंपदा विषय आल्यावर मंत्री उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोवर पाठीमागे बसलेले राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पाहून आमच्याकडे लक्ष आहे का? की बोलणे बंद करू असे म्हणत शिवतारे आधी चांगले होते पण आता लक्ष देत नाहीत. वाण नाही पण गुण लागला की काय अशी खोचक।टीका केली. औटी म्हणाले की, मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये काहीच बदल दिसून येत नाही. अनेक फसव्या योजना काढून शेतकऱ्यांना फसविण्याचे काम सरकार करत आहे. एवढ्या मोठ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय? असा सवालही त्यांनी केला. आमच्या मंत्रिमंडळात मंत्री बदलले की जलसंधारणात 500 कोटींची गफलत होते? हे गंभीर असल्याचे औटी म्हणाले. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात पैसेच नसल्याचे सांगत त्यांनी सरकारवर चांगल्याच फैरी झाडल्या.

सरकारने आता धाडसी निर्णय घ्यावेत:- उन्मेष पाटील
मुख्यमंत्री गतिमान सरकार चालविण्याचे ध्येय बाळगून असताना सरकारचे अनेक विभाग ढिम्म असल्याची टीका भाजप आ. उन्मेष पाटील यांनी करत सरकारवर तोफ डागली. पाटील पुढे म्हणाले की, 65 ते 70 हजार कोटींची कामे प्रलंबित आहेत. असं जर राहिलं तर 50- 50 वर्ष प्रकल्प पूर्ण होणार नाहीत. यासाठी सरकारला आता धोरणात्मक आणि धाडसी निर्णय घेण्याची गरज असल्याचे आ.पाटील म्हणाले. आ. पाटील म्हणाले की, कालव्यांची दुरुस्ती होत नाही. तसेच जळगाव जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा होऊन कित्येक दिवस लोटले तरी साधी जमीन मिळत नाही ही सरकारसाठी खेदाची बाब असल्याचे उन्मेष पाटील यांनी सांगितले. तालुकास्तरावर कृषी विज्ञान केंद्र स्थापन होण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कृषिप्रधान असलेल्या या राज्यात तालुक्याच्या ठिकाणी अशी केंद्र निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच प्रशिक्षण केंद्र, खातयुक्त शिवार अशा योजनाही राबविणे गरजेचे आहे. बिनाव्याजाची शेती करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज असल्याचे आ. उन्मेष पाटील यांनी सांगितले. निधी नाही म्हणून किती दिवस रडायचे. निधी उभारण्यासाठी धोरण तयार करण्याबाबत कार्यवाही व्हायला हवी असेही पाटील यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेत बोलताना सांगितले.