सत्ताधारी नगरसेवकाकडून स्वखर्चाने हातपंपाची दुरुस्ती

0

प्रा.दिनेश राठी यांचा उपक्रम ; प्रभागातील नागरीकांना दिलासा

भुसावळ- प्रभागातील नागरीकांची होणारी पाण्यासाठी भटकंती पाहता भाजपाचे सत्ताधारी नगरसेवक प्रा. दिनेश राठी यांनी गेल्या चार वर्षांपासून बंद असलेले प्रभाग दहामधील हातपंप स्वखर्चातून दुरुस्त केल्याने प्रभागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले. प्रभाग दहामध्ये पाच हातपंप असून गेल्या साडेतीन ते चार वर्षांपासून ते बंदावस्थेत होते. पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही हे हातपंप कार्यान्वित न झाल्याने व प्रभागातील नागरीकांची होणारी पाण्यासाठी भटकंती पाहता प्रा.दिनेश राठी यांनी तातडीने प्रभागातील सर्व हातपंपांची स्वखर्चातून दुरुस्ती केली.

गळतीला ब्रेक ; नागरीकांना दिलासा
हातपंपाची दुरुस्ती झाल्याने प्रभागातील रहिवाशांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. यासह या भागात तब्बल आठ ठिकाणी पाईप लाईनला गळती लागल्याने पाण्याची नासाडी होत होती. ही गळतीदेखील थांबवण्यात आली आहे. प्रभाग दहामधील लहान मारुती मंदिराकडून महाराष्ट्र बँकेकडे जाणार्‍या रस्त्यावर महाजन वाड्याच्या परीसरात रस्त्यावरच ड्रेनेजचा खड्डा होता. तीन दिवसांपूर्वी या खड्ड्यात लहान मुलगी पडल्याने ती जखमी झाली. ही माहिती मिळताच नगरसेवक प्रा. राठी यांनी हा खड्डा स्वखर्चातून बुजवला. यामुळे आता अपघातांचे प्रमाणही थांबण्यास मदत झाली आहे. प्रा.राठी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रभागातील नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहेत.