जळगाव (प्रदीप चव्हाण)। लोकसभा निवडणुक 2014 मध्ये पार पडली. ही निवडणुकीला या वर्षी तिसरे वर्ष पुर्ण होत आहे. सरकारला तीन वर्ष पुर्ण झाल्याने भाजपातर्फे वर्षपूर्ती सोहळा साजरा करत आहे. भाजप सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे तर विराधी पक्ष सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारचा कार्यकाळ 2019 मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुक होईल. अजुन निवडणुकीला दोन वर्षाचा कालावधी आहे मात्र सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांच्या हालचालीवरुन लोकसभा निवडणुकची तयारी तर सुरु झाली नाही ना? असा प्रश्न सर्व सामान्याना आहे. भाजप शिवार संवाद यात्रा, राष्ट्रवादी कॉग्रेस संघर्ष यात्रा, शिवसेना भगवा सप्ताह, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेली आत्मक्लेश यात्रा लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने असल्याचे सांगण्यात येत आहे.
संवादातुन मनोमिलनाचा प्रयत्न
भाजप या पक्षाची घोडदौड ही 2014 पासून अविरत सुरु आहे. 2014 पासून देशातील बहुतांश राज्यात भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षांची घौडदौड सुरु आहे. ग्रामपंचायत पासून तर संसदेपर्यत भाजपाने एक हाती सत्ता मिळविली आहे. मात्र काही दिवसांपासून विरोधकांकडून सरकारवर वेगवेगळे आरोप होत आहे. आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपाने संवाद यात्रा सुरु केली असून यात्रेद्वारे सरकारने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहे. लोकसभा निवडणुक समोर ठेवून संवादातुन जनतेशी मनो मिलनाचा भाजपाचा प्रयत्न दिसून येत आहे.
पक्षांनी चालविले उपक्रम
सातबारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करावे, महागाई दर कमी करणे आदी मागणी प्रमुख विरोधी पक्ष सरकारकडे करत आहे. मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसपक्ष संघर्ष यात्रेतुन सरकारचे कुकर्म जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना भगवा सप्ताहाच्या माध्यमातून शेतकर्यांकडून सरकारबाबत मत प्रश्नावलीद्वारे नोंदवित आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ’शेतकर्यांना अडवल्यास, अडवाल तिथेच ठिय्या आंदोलन सुरु करु’ करण्याचा इशारा दिला आहे.
मतदारांचा कल जाणण्यासाठी
दोन वर्षानंतर देशातील लोकसभा निवडणुक जाहीर होणार आहे. निवडणुकी अगोदर जनता सत्ताधारी पक्षांच्या कामकाजाने सहमत आहे किंवा नाही याबाबत प्रतिक्रिया घेण्याचा काही आघाडीचे पक्ष प्रयत्न करीत आहे. जनतेचा कौल बघुन राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारी करणे सोपी जाणार आहे. काहीही असो या निमित्ताने तरी राजकीय पक्ष ’वोट बँक’ टिकवून ठेवण्यासाठी जनतेपर्यत जावून समस्या जाणून घेत आहे.