जालन्यात दानवेंच्या विरोधात लोकसभा लढविणार
राज्यमंत्री खोतकर यांचे प्रतिपादन
जालना :- सत्तेत असलेले भाजप आणि शिवसेनेचे भांडण थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीये. राज्यात भाजपच्या विरोधात लढण्यासाठी सेनेने दंड थोपटले असून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार आहे, असे राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. अर्जुनाच्या हाती बाण आला की वध दानवाचा होणार, असे म्हणत त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना टोलालगावला आहे.
“मी 30 वर्ष निवडणूक लढवत आहे. जालन्यातून सहा वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेची साथ मिळाल्याने इथे त्यांना फायदा मिळाला होता. परंतु जालन्याचा मतदारसंघ हा शिवसेनेच्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे इथे शिवसेनाच निवडणूक लढवणार आणि जिंकणार. बाण शिवसेनेचा असेल आणि वध दानवाचा होणार,” असे अर्जुन खोतकर म्हणाले.
जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी जालन्याला भेट देऊन तिथे बैठक घेतली. या बैठकीत उमेदवारांची चाचपणी केली.