सत्ताधारी, विरोधकांचे एकमेकांवर मोर्चास्त्र

0

भुसावळ। शहरात जनाधार विकास पार्टी व भारतीय जनता पक्षातर्फे परस्परविरोधात सोमवार 3 रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात आले. यात विशेष म्हणजे जनाधारच्या मोर्चात केवळ दोन- चार नगरसेवक वगळता इतर नगरसेवकांची अनुपस्थिती दिसून आली. त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून जनाधार पार्टीतच फुटीचे दर्शन घडले.

राजकीय कार्यकर्त्यांकडून मुख्याधिकार्‍यांवर हल्ला होण्याची शक्यता
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जनाधार पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना धक्काबुक्की करुन सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. याबाबत मुख्याधिकार्‍यांनी पोलीसात तक्रार दिल्याने काही राजकीय व्यक्ती हे मुख्याधिकार्‍यांवर हल्ला करण्यासह खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी मुख्याधिकार्‍यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे. भाजपा नगरसेवकांतर्फे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यात नमूद करण्यात आले की, पालिका सभागृहात जनाधार विकास पार्टीचे गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक रवी सपकाळे, संतोष (दाढी) चौधरी यांनी मुख्याधिकार्‍यांना धक्काबुक्की केली होती. यावरुन पोलीसात गुन्हा दाखल झाल्याने याचा राग मनात धरुन काही राजकीय व्यक्ती, नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते मुख्याधिकार्‍यांवर हल्ला चढवून, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत. यामुळे विकासकामांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहे. बाविस्कर हे कार्यक्षम व प्रामाणिक अधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे पोलीस संरक्षण मिळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता हाजी मुन्ना तेेली, नगरसेवक प्रमोद नेमाडे, महेंद्रसिंग ठाकुर, प्रितमा महाजन, सोनल महाजन, प्रतिभा पाटील, मंगला आवटे आदी नगरसेवक उपस्थित होते.

मुख्याधिकार्‍यांना निलंबित करा
पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मुख्याधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी जनाधार पक्षाच्या तीन नगरसेवकांविरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात येऊन बेजावाबदार वागणूक करणार्‍या मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना निलंबीत करा, अशी मागणी जनाधार पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जनाधार पार्टी व पीपल्स रिपाइंतर्फे गांधी पुतळा ते प्रांत कार्यालय धडक मोर्चा काढण्यात आला. यानंतर प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले.

पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, जनाधार विकास पार्टीचे सचिन चौधरी नगरसेविका पुष्पा सोनवणे, दुर्गेश ठाकुर, सलिम पिंजारी, सिकंदर खान, प्रदिप देशमुख, प्रदिप जवरे, राजू डोंगरदिवे, एस.पी. देशमुख, खान शब्बानाबी, पुष्पा चौधरी, हरिष बोरसे, राहुल बोरसे, लता पाटील, अभिजीत मराठे, शे. जाकीर शे. सरदार, निलीमा पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या आहेत जनाधार पार्टीच्या मागण्या
पालिकेची बेकायदेशीर सर्वसाधारण सभा रद्द करण्यात यावी, सत्ताधारी व मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांनी जनतेला वेठीस धरुन 10 टक्क्यांनुसार होत असलेली करवसुली थांबवावी, शहरात मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यात सत्ताधारी अपयशी झाले असून महिनाभरात विकास कामांची सुरुवात न झाल्यास नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, प्रांताधिकार्‍यांनी मुख्याधिकारी बाविस्कर यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्यामुळे अशा बेजवाबदार मुख्याधिकार्‍यांना निलंबीत करण्यात यावे, मुख्याधिकार्‍यांनी उल्हास पगारे, रवि सपकाळे, संतोष चौधरी (दाढी) यांच्या खोटे गुन्हे दाखल केले असून ते रद्द करण्यात यावे, तसेच अजेंड्यावर घेण्यात आलेले बरेचशे विषय न्यायप्रविष्ठ आहेत. यात आर्थिक देवाण घेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन निलंबीत करावे आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.