राज्यात शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न, वाढता धर्मांधपणा, भ्रष्टाचार यासह अनेक प्रश्न विरोधकांनी एकसारखे लावून धरल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर पुरते वैतागलेले आहेत. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगी तुरा सुरू झाला आहे. मंत्र्यांवरील घोटाळ्यांच्या आरोपांमुळे मुख्यमंत्री हवालदिल झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले होते की, 2050 पर्यंत भाजपचेच राज्य राहणार आहे. यावर विरोधक थोडेच गप्प बसणार! राज्यातील जाणते नेते , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहा यांना टोला लगावला की, अमित शहा यांनी ज्योतिष्याचा धंदा केव्हा सुरू केला. शरद पवार केव्हा काय बोलतील, हे सांगता येत नाही. यामुळे घटकाभर लोकांचे मनोरंजन होत असले तरी पवारांनी शहांना चांगलेच खडसावले आहे की, जनता निवडून देणार आहे. ती कुणाला निवडून देईल हे तुम्ही ठरवू नका. सध्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात फूट पडली आहे. या फुटीचे कारण भाजपचे राजकारण आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे सदाभाऊ खोत यांना राज्यात मंत्रीपद मिळाले. परंतु सदाभाऊ सत्तेत एवढे चूर झाले की, ते जवळ जवळ भाजपवासी झाल्यात जमा आहेत. कारण शेतकऱयांनी पहिल्यावेळी संप केला होता, तो पुणतांब्याचा संप सदाभाऊंनी कौशल्याने अयशस्वी केल्याचा आरोप सदाभाऊंवर शेतकऱयांनी केला होता. परंतु शेतकरी सदाभाऊंच्या गोड बोलण्याला भुलले नाहीत. शरद पवार यांना स्वाभीमानी शेतकरी संघटनेतील फुटीबाबत व शेट्टी आणि खोत यांच्यातील वादाबाबत पत्रकारांनी कोल्हापुरात विचारल्यानंतर पवार म्हणाले की, राजू शेट्टी यांचे काम लोकसभेत दिसते; पण तुम्ही जे दुसरे नाव (सदाभाऊ खोत) घेतले, ते माहित नाहीत. त्यांचे काय योगदान आहे? त्यांनी कुठे लाठ्याकाठ्या खाल्ल्या, कोणत्या हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होते? पवारांनी सदाभाऊंचे नाव न घेता त्यांना अशी चपराक दिली. पवार अधुनमधून असे बोलतातच, त्याशिवाय प्रसारमाध्यमांचे त्यांच्याकडे लक्ष कसे जाईल? राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर टिका केली आहे की , हे राज्य सरकार भ्रष्टाचारी आहे. मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली सुटका करण्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी न करता ते प्रकरण लोकायुक्तांकडे दिले आहे. चव्हाण यांचे म्हणणे तपासले तर फडणवीस सरकार गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पाठीशी घालत असल्याचे दिसते. यामुळे राज्य सरकारच्या कारभारातील पारदर्शकता संपली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला चार वर्षे झाली, तरी तपास लागलेला नाही. या प्रकरणी सनातन संस्थेवर संशय असून सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील नसल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवले आहे. चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र सरकारला सनातनवर बंदी घालावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव व आवश्यक माहितीही दिली. परंतु हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अजुनही धुळ खात पडला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कार्यकाळात त्यांनी आरोपींना पकडून देणाऱयास बक्षिस जाहीर केले होते, त्या रकमेतही विद्यमान सरकारने कपात केली आहे.
अशोक सुतार- 8600316798