सत्ताधारी सेनेने कर्जमाफीचा ठराव नाकारला

0

धुळे । गेल्या एक जुन पासुन राज्यातील शेतकरी संपावर जाऊन कर्जमाफीसाठी सरकारशी लढा देत आहे. धुळे जिल्ह्यातही शेतकर्‍यांसह संघटना,राजकीय पक्षांनी अनेक ठिकाणे आंदोलने करत निदर्शने केली. दरम्यान दि.8 रोजी जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्हा नियोजन समीतीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली.यावेळी विरोधकांनी एक ओळीचा कर्जमाफीचा ठराव करण्याची मागणी केली. पंरतू शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भूसे सह आ.जयकुमार रावल आदिंनी नकार दर्शविला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, रोहयो व पर्यंटन मंत्री जयकुमार रावल, आ.अनिल गोटे, आ.कुणाल पाटील, जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, एसपी एम.रामकुमार, आ.डि.एस.अहिरे, आ.काशिराम पावरा, नगरसेवक हिरामण गवळी, नगरसेवक बंटी मासुळे, दीपक शेलार, नगरसेविका सुशीलाबाई ईशी आदी सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांना सभेत बसण्यास मनाई
भारताची सार्वभौम संस्था असलेल्या संसदेत तसेच न्यायालय, विधान सभा,लोकसभा या ठिकाणी पत्रकांरांना वार्तांकन करण्यासाठी बंधन नसते. या ठिकाणीपत्रकांराना वार्तांकनासाठी स्वतंत्र कक्ष असतो. मात्र, जनतेशी निगडीत असलेल्या विविध प्रश्‍नांवर ज्या ठिकाणी चर्चा होते त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकारांना वार्तांकनासाठी मज्जाव का केला जात असल्याने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत होता. त्यावरून माजी आ.शरद पाटील यांनी पत्रकारांना या बैठकीला बसू द्यावे, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

नियोजन समिती बैठक कर्जमाफीने गाजली
या एक ओळीच्या कर्जमाफीच्या ठरावाची मागणी काँग्रेसचे आ.कुणाल पाटील यांनी केली असता भाजपचे आ.अनिल गोटे यांच्यात खडाजंगी झाली. तर ट्रॉमा सेंटरची जागा बदलाच्या कारणावरुन शिवसेनेचे प्रा.शरद पाटील व जि.प. सभापती मधुकर गर्दे यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली. यावेळी जिल्हा नियोजन समितीची बैठक ही शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन चांगलीच गाजली. कर्जमाफीचा एक ओळीचा ठराव करण्यात यावा, या विरोधकांच्या मागणीवरुन भाजप व विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एकीकडे शेतकर्‍यांचा कळवळा घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरुन मित्रपक्ष असलेल्या भाजपला कोंडीत पकडत आहे. तर दुसरीकडे झालेल्या जिल्हा नियोजन सभेत अध्यक्ष असलेले शिवसेनेचे पालकमंत्री दादा भुसे यांनी एक ओळीचा शेतकरी कर्जमाफीचा ठराव करू नये, हा फार मोठा विरोधाभास आज सर्वांना पहायला मिळाला.

कृषी विभागावर गोटेंचा रोष
आ.अनिल गोटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत अधिकार्‍यांना धारेवर धरले. त्यांना जाब विचारला. अधिकारी काम करीत नसल्याने या सरकारची बदनामी होत आहे. हे सरकार पाडायला अधिकारीच जबाबदार असतील, असा खोचक टोलाही आ.गोटे यांनी यावेळी लगावला. यानंतर अक्कलपाडा धरणातील पाण्यावरुन शिवसेनेचे माजी आ.प्रा.शरद पाटील व आ.कुणाल पाटील यांच्यात आणि अन्य एका विषयावरुन माजी आ.पाटील व शिक्षण सभापती मधुकर गर्दे यांच्यात जोरदार वाद झाला.नियोजन समिती सदस्य बंटी मासुळे यांनी धुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरु असलेली 156 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरु असल्याची तक्रार पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यासाठी केवळ 12 कर्मचारी आहेत. संपूर्ण शहरात हे 12 कर्मचारी कधी काम करणार आहेत. उपमहापौर व सभापती यांनी आंदोलने करुनही पाणी पुरवठा योजनेचे काम धीम्या गतीने सुरु आहे, अशी तक्रारही मासुळे यांनी केली.

अतिसंवेदनशील भागात ‘सीसीटीव्ही’ लावा
शहरात अतिसंवेदनशील भागात तातडीने ’सीसीटीव्ही’कॅमेरे लावण्याचीही मागणी मासुळे यांनी केली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी जीवन प्राधिकरण विभागाचे सुर्यवंशी यांना या कामासंदर्भात सूचना केल्यात. तसेच शहरात सीसीटीव्ही कॅमेर्‍या संदर्भात एसपी रामकुमार यांच्याशी चर्चा करुन लवकर ते काम मार्गी लावावे, असे सांगितले. या बैठकीत तालुकानिहाय विकास कामांसाठी मंजूर निधी, खर्च झालेल्या निधी, कामांची सद्यस्थिती यासह आगामी काळात धुळे जिल्ह्यात करण्यात येणार्‍या कामांबाबत सविस्तर चर्चा करुन विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.