सत्ताधार्‍यांकडून पुतळा पुनर्स्थापनेबाबत दिशाभूल

0

भाजपाचे डॉ. रवींद्र चौधरी यांचा आरोप

नंदुरबार । शासनाची परवानगी घेऊन शिवरायांचा पुतळा जुन्याच जागेवर बसविण्याच्या नगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाला भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रवींद्र चौधरी यांनी हरकत घेतली आह. जुन्या जागेवर पुतळा बसविण्याला कोणत्याही परवानगीची गरज नाही, मात्र नगरपालिका सत्ताधारी शिवप्रेमींच्या भावनांशी खेळ खेळत असल्याचा आरोप रवींद्र चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला आहे. नगरपालिका सभेत शिवरायांचा अर्धाकृती पुतळा जुन्याच जागेवर बसविण्याला मंजुरी देण्यात आली आहे. नगराध्यक्ष रत्नाताई रघुवंशी यांनी याबाबत माहिती दिली होती. हा धागा पकडून डॉ. रवींद्र चौधरी यांनी रविवारी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

आंदोलनाचा इशारा
या निवेदनात डॉ. चौधरी यांनी म्हटले आहे की, वास्तविक जुन्या जागेवर पुतळा बसवायला कोणत्याही परवानगीची गरज नसते,अशी कोणतीच प्रक्रिया आम्ही न करता अमळनेर येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उदाहरण देता येईल असे त्यांनी म्हटले आहे. नवीन पुतळा उभारावयाचा असेल तर शासनाची परवानगी आवश्यक असते. जुन्या पुतळ्यासाठी नाही. असे असतांना पालिकेच्या सत्ताधार्‍यांनी पुतळाबाबत धूळफेक करीत राष्ट्रपुरुषांच्या विचारांना न्याय न देण्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप केला आहे. जिल्ह्यधिकार्‍यांच्या समितीकडे पूर्वीची परवानगी व ठरावाची प्रत जोडून प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला जाऊ शकतो, मात्र तसे होत नाही. शिव पुतळ्याबाबत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिला आहे.