महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांची टीका
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेल्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट सत्ताधार्यांनी घातला आहे. स्वत: विकास कामे करावीत आणि नावे बदलावीत. दुसर्याने केलेल्या विकासकामांचे नाव बदलण्याचा अधिकार सत्ताधार्यांना कोणी दिला आहे. नाव बदलण्याचा घाट म्हणजे सूडाचे राजकारण आहे, अशी टीका महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. महापालिका मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्ताधार्यांवर टीकास्त्र सोडले.
सर्वत्र टक्केवारीचे राजकारण
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर जुन्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट घातला जात आहे. संभाजीनगर, शाहूनगर परिसरातील सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव क्षेत्रिय सभेत ठेवला आहे. भाजपची सत्ता येऊन सहा महिने झाले. पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराचा अनुभव आपण घेत आहोत. केवळ ठेकेदारांकडून वसुली सुरू आहे. मनमानी आणि हुकूमशाही पद्धतीने टक्केवारीचे राजकारण सुरू असल्याचे बहल म्हणाले.
दुसर्याच्या कामाचे श्रेय घेणे योग्य नाही
गेल्या 15 वर्षांत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने शहराचा कायापालट केला. मात्र, आता जुन्याच प्रकल्पांची उद्घाटने पुन्हा चुकीच्या पद्धतीने केली जात आहेत. श्रेयासाठी हा प्रकार सुरू आहे. संत तुकारामनगर परिसरात काम करताना भाजपचे वसंत शेवडे यांनी नगरसेवक असताना विकासकामे केली. त्यावेळी दीनदयाळ उपाध्याय शाळा, बी. डी. किल्लेदार उद्यान, जनरल अरुणकुमार वैद्य अग्निशामक दल अशी विविध प्रकल्पांना नावे दिली. या भागाचे नेतृत्व आपण 25 वर्षे करीत असताना कधी विरोधकांनी तयार केलेल्या प्रकल्पांची नावे बदललेली नाही. सुडाचे राजकारण करायचे असते तर मी करू शकलो असतो. पालिकेतील सर्व महत्त्वाच्या पदांवर मी होतो. परंतु, आम्हाला सुडाचे राजकारण करायचे नाही. दुसर्याच्या कामाचे श्रेय घेणे योग्य नाही, असेही बहल म्हणाले.